Tilak Varma : इंग्लंडच्या भूमीवर भारतीय खेळाडूचा धमाका! पदार्पणाच्या सामन्यातच झळकावलं दमदार शतक

Tilak Varma County Debut Century : इंग्लंडच्या भूमीवर भारतीय संघाचा डावखुरा फलंदाज तिलक वर्माने दमदार पदार्पण केले आहे. काउंटी क्रिकेटमधील तिलकची पहिली खेळी अत्यंत संस्मरणीय ठरली आहे. तिलक जेव्हा फलंदाजीला उतरला, तेव्हा हॅम्पशायर संघ अवघ्या ३४ धावांवर २ गडी गमावून संकटात होता. मात्र, यानंतर तिलकने खंबीरपणे परिस्थिती हाताळली आणि दडपणाखाली उत्कृष्ट फलंदाजी करत जोरदार शतक झळकावले. तिलकने २३९ चेंडूंमध्ये आपले पहिले शतक पूर्ण केले.
तिलक वर्माचे काउंटी क्रिकेटमध्ये दमदार पदार्पण –
कसोटी क्रिकेटमधील तिलकची हा दमदार खेळी भारतीय संघासाठी भविष्याच्या दृष्टीने मोठी आनंदाची बातमी आहे. तिलक वर्माने काउंटी क्रिकेटमध्ये दमदार पदार्पण करताना शतक ठोकले आहे. हॅम्पशायरकडून खेळताना तिलकने आपल्या पहिल्याच सामन्यात शतकी खेळी साकारली. जेव्हा तिलक फलंदाजीला उतरला, तेव्हा हॅम्पशायरला अवघ्या ३४ धावांवर दोन मोठे धक्के बसले होते. मात्र, त्यानंतर तिलकने संयमी फलंदाजी करत शानदार शतक झळकावले.
🚨 HUNDRED FOR TILAK VARMA ON HIS COUNTY DEBUT 🚨
– Tilak came when Hampshire was 34/2 and then Tilak completed Hundred from 239 balls under pressure, He is making big steps in all formats for India, Great news for the future. 🇮🇳 pic.twitter.com/D7O0E3m6cb
— Johns. (@CricCrazyJohns) June 24, 2025
डावखुऱ्या फलंदाजाने दडपणातही उच्च दर्जाचा खेळ दाखवला. या खेळीत तिलकने ११ चौकार आणि तीन उत्तुंग षटकार मारले. तिलकने तिसऱ्या विकेटसाठी फ्लेचा मिडलटनसोबत अर्धशतकी भागीदारी केली. त्यानंतर बेन ब्राउनसह चौथ्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदारी रचली. ब्राउनने ६८ चेंडूंमध्ये ४२ धावा केल्या.
हेही वाचा – क्रिकेट विश्वावर शोककळा; IND vs ENG कसोटीदरम्यान भारताच्या माजी फिरकीपटूचे निधन
हॅम्पशायर संघ मजबूत स्थितीत –
तिलक वर्मा आणि लियाम डॉसन यांच्या शतकी खेळीच्या जोरावर हॅम्पशायरने पहिल्या डावात मजबूत स्थिती प्राप्त केली आहे. बातमी लिहिताना हॅम्पशायरने ५ गडी बाद ३३९ धावा केल्या होत्या. डॉसन ११० धावांवर नाबाद आहे. मिडल्टननेही उत्कृष्ट फलंदाजी करत ८२ चेंडूंत ६१ धावांची दमदार खेळी केली. यापूर्वी, एसेक्सचा पहिला डाव २९६ धावांत आटोपला. एसेक्सकडून चार्ली ऍलिसनने शानदार शतकी खेळी केली.





