India vs Australia 5th T20 Match Update : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील शेवटचा सामना बंगळुरूत खेळवला गेला.सिरीज जिंकल्यानंतर भारतीय टीमने शेवट देखील गोड केला. अर्शदीप सिंगने शानदार बॉलिंग करत मॅचचा रंगच बदलून टाकला. टीम इंडियाने पाचवी टी-20 मॅच 6 रन्सनं जिंकली.
ऑस्ट्रेलियाविरुद्धची पाच सामन्यांची टी-२० मालिका ४-१ ने जिंकण्यात भारतीय संघाला यश आले. बेंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या मालिकेतील पाचव्या सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 8 विकेट गमावून 160 धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघ केवळ 154 धावांपर्यंत मजल मारू शकला. मुकेश कुमारने टीम इंडियासाठी गोलंदाजीत आश्चर्यकारक कामगिरी केली आणि 3 महत्त्वपूर्ण बळी घेतले.
161 धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाची सुरुवात चांगली झाली नाही. 22 च्या धावसंख्येवर त्याला पहिला धक्का जोश फिलिपच्या रूपाने बसला जो अवघ्या 4 धावा करून मुकेश कुमारच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याचवेळी ट्रॅव्हिस हेडने दुसऱ्या बाजूने वेगाने धावा काढत राहिला पण त्याला रवी बिश्नोईने 28 च्या वैयक्तिक धावसंख्येवर बाद करून टीम इंडियाला मोठे यश मिळवून दिले. ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्या 6 षटकांत 2 गडी गमावून 50 धावांपर्यंत मजल मारली.
वेडने सामना रोमांचक केला
पहिली 6 षटके संपल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या संघाला 55 धावांवर अॅरॉन हार्डीच्या रूपाने तिसरा धक्का बसला, जो रवी बिश्नोईचा बळी ठरला. यानंतर टीम डेव्हिड आणि बेन मॅकडरमॉट यांनी मिळून आपल्या संघाचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला आणि धावसंख्या 100 च्या पुढे नेली. टीम डेव्हिडची विकेट घेत अक्षर पटेलने ही धोकादायक भागीदारी मोडली. ऑस्ट्रेलियाला 102 धावांवर चौथा धक्का बसला आणि त्यानंतर लगेचच मॅकडरमॉटही 54 धावांची खेळी खेळून अर्शदीप सिंगचा बळी ठरला. येथून ऑस्ट्रेलियन कर्णधार मॅथ्यू वेडने एका बाजूने डाव सांभाळत संघाला विजयाकडे नेण्याचा प्रयत्न केला.
अखेरच्या षटकात अर्शदीप सिंगच्या अप्रतिम गोलंदाजीमुळे भारतीय संघ सामना जिंकू शकला. अखेरच्या षटकात ऑस्ट्रेलियन संघाला विजयासाठी 10 धावांची गरज होती आणि त्यावेळी वेड स्ट्राइकवर होता, परंतु अर्शदीपने पहिल्या दोन चेंडूंवर एकही धाव न देता आणि तिसऱ्या चेंडूवर वेडची विकेट घेत भारतीय संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. ऑस्ट्रेलियन संघाला 20 षटकात 8 विकेट गमावून 154 धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताकडून गोलंदाजीत मुकेश कुमारने 3, रवी बिश्नोई आणि अर्शदीप सिंगने 2-2 तर अक्षर पटेलने 1 बळी घेतला.
अय्यर आणि अक्षरची संयमी बॅटिंग
तत्पूर्वी भारताकडून सलामीचे फलंदाज कोणतीही जादू दाखवू शकले नाहीत. यानंतर श्रेयस अय्यरने एक बाजू सांभाळत संघाला चांगल्या धावसंख्येपर्यंत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, त्यात त्याला अक्षर पटेलचीही उत्तम साथ लाभली. या सामन्यात अय्यरने 37 चेंडूत 53 धावा केल्या तर अक्षर पटेलने 21 चेंडूत 31 धावा केल्या, त्यामुळे भारताला 160 धावांपर्यंत मजल मारता आली. ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजीत बेहरेनडॉर्फ आणि द्वारशुइसने २-२ बळी घेतले.