IND vs AUS 4th T20 : भारत-ऑस्ट्रेलिया चौथा T20 सामना होणार रायपूरमध्ये; जाणून घ्या, Team India चे येथील रेकॉर्ड …

India vs Australia 4th T20 in Raipur : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 मालिकेतील चौथा सामना रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंह स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना शुक्रवारी होणार आहे. भारताने पहिले दोन सामने जिंकले होते. यानंतर ऑस्ट्रेलियाने तिसरा सामना जिंकला. टीम इंडिया आता सीरिजवर कब्जा करण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. रायपूरमध्ये भारतीय संघ प्रथमच टी-20 सामना खेळणार आहे.
टीम इंडिया पहिल्यांदाच रायपूरमध्ये टी-20 सामना खेळणार आहे. याआधी येथे फक्त एक वनडे सामना खेळला गेला आहे. भारताने तो सामना जिंकला होता. वास्तविक, जानेवारी 2023 मध्ये रायपूरमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यात एकदिवसीय सामना खेळला गेला होता. यामध्ये न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद 108 धावा केल्या होत्या. या काळात ग्लेन फिलिप्सने सर्वाधिक 36 धावा केल्या होत्या. संघातील बहुतांश खेळाडूंना विशेष काही करता आले नाही.
टीम इंडियाकडून गोलंदाजी करताना मोहम्मद शमीने 3 बळी घेतले. हार्दिक पांड्या आणि वॉशिंगटन सुंदरने प्रत्येकी दोन गडी बाद केले. मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि कुलदीप यादव यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
न्यूझीलंडने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाने 2 गडी गमावून लक्ष्य गाठले. संघासाठी कर्णधार रोहित शर्माने अर्धशतक झळकावले होते. त्याने 50 चेंडूत 51 धावा केल्या होत्या. शुभमन गिल 40 धावा करून नाबाद राहिला. विराट कोहली 11 धावा करून बाद झाला. इशान किशनने 8 धावांचे योगदान दिले होते. अशा प्रकारे भारताने हा सामना 8 विकेटने जिंकला होता.
दरम्यान, भारताने पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 2 विकेटने जिंकला होता. दुसरा सामना 44 धावांनी जिंकला. यानंतर ऑस्ट्रेलियाने मालिकेत दमदार पुनरागमन केले. गुवाहाटी येथे खेळलेला सामना 5 विकेटने जिंकला. आता 1 डिसेंबरला भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होणार आहे. त्यानंतर पाचवा आणि अखेरचा सामना 3 डिसेंबरला होणार आहे.





