Uganda cricket team, T20 World Cup 2024 : युगांडा क्रिकेट संघाने इतिहास रचला आहे आणि 2024 मध्ये खेळल्या जाणाऱ्या T20 विश्वचषकासाठी पात्रता मिळवली आहे . गेल्या मंगळवारी, नामिबियाचा संघ आफ्रिका क्वालिफायरद्वारे टी20 विश्वचषक 2024 साठी पात्र ठरला होता. आता युगांडा क्रिकेट संघाने 2024 टी-20 विश्वचषकाच्या दिशेने पाऊल टाकले आहे.
आफ्रिका क्वालिफायर्समधून T20 विश्वचषकासाठी पात्र ठरणारा युगांडा हा दुसरा संघ ठरला. युगांडाने क्वालिफायरच्या सहाव्या सामन्यात रवांडाचा 9 गडी आणि 71 चेंडू राखून पराभव करून टी-20 स्पर्धेसाठी पात्रता मिळवली. क्वालिफायरमध्ये युगांडाने 6 पैकी 5 सामने जिंकले.
रवांडा विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या रवांडा संघाला युगांडाच्या गोलंदाजांनी अवघ्या 18.5 षटकात 65 धावांत गुंडाळले. त्यानंतर प्रत्युत्तरात लक्ष्याचा पाठलाग करताना 8.1 षटकांत 1 गडी राखून विजय मिळवला.
क्वालिफायरच्या पहिल्या सामन्यात युगांडाने टांझानियाचा 8 गडी आणि 28 चेंडू राखून पराभव केला. त्यानंतर पुढच्या सामन्यात त्यांना नामिबियाविरुद्ध 6 विकेट्सने पराभव स्विकारावा लागला. मात्र, त्यानंतर युगांडाने एकही सामना गमावला नाही. तिसऱ्या सामन्यात युगांडाने झिम्बाब्वेचा 5 गडी आणि 5 चेंडू बाकी राखून पराभव केला. पुढे जात युगांडाच्या संघाने चौथ्या सामन्यात नायजेरियाचा 9 गडी आणि 15 चेंडू राखून पराभव केला. त्यानंतर पाचव्या सामन्यात केनियाचा 33 धावांनी पराभव केला आणि सहाव्या सामन्यात रवांडाचा 9 गडी राखून पराभव केला आणि 2024 च्या T20 विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरले. अशाप्रकारे युगांडाने सलग चार सामने जिंकले.
T20 विश्वचषकासाठी आतापर्यंत पात्र ठरलेले संघ….
वेस्ट इंडिज, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, नेदरलँड, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश, आयर्लंड, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनी, कॅनडा, नेपाळ, ओमान, नामिबिया, युगांडा.