IND vs AUS 1st Test : पर्थ कसोटीचा पहिला दिवस गोलंदाजांनी गाजवला, ऑस्ट्रेलियाच्या माऱ्यानंतर भारताचाही जोरदार पलटवार…

IND vs AUS 1st Test (Day 1 Full Highlights) : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला आजपाूसन (शुक्रवार, 22 नोव्हेंबर) पर्थमधील पहिल्या कसोटी सामन्याने सुरुवात झाली आहे. दोन्ही संघांसाठी ही मालिका महत्त्वाची असून जागतिक कसोटी स्पर्धेच्या अंतिम फेरीत कोणता संघ पोहोचणार हे या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024 निकालानंतर स्पष्ट होणार आहे. भारताला किमान चार कसोटी जिंकणे आवश्यक आहे. याशिवाय संघ एकही सामना हरणार नाही याचीही काळजी घ्यावी लागेल.
दरम्यान, पर्थ कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 7 गडी गमावून 67 धावा केल्या आहेत. भारताने पहिल्या डावात सर्वबाद 150 धावा केल्या होत्या. यानुसार ऑस्ट्रेलिया अजूनही 83 धावांनी मागे आहे. पहिल्याच दिवशी दोन्ही संघांच्या मिळून एकूण 17 विकेट्स पडल्या. भारतीय फलंदाजी फ्लॉप ठरल्याने संघाचा डाव 150 धावांवरच आटोपल्यानंतर ऑस्ट्रेलियाचे पूर्णपणे वर्चस्व दिसत होते, पण ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव आणखीनच खराब झाला.
That’s Stumps on what was an engrossing Day 1 of the 1st #AUSvIND Test!
7⃣ wickets in the Final Session for #TeamIndia! 👌👌
4⃣ wickets for Captain Jasprit Bumrah
2⃣ wickets for Mohammed Siraj
1⃣ wicket for debutant Harshit RanaScorecard ▶️ https://t.co/gTqS3UPruo pic.twitter.com/1Mbb6F6B2c
— BCCI (@BCCI) November 22, 2024
ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. तिसऱ्याच षटकात बुमराहने नॅथन मॅकस्विनीला एलबीडब्ल्यू आऊट केले. त्याला 10 धावा करता आल्या. यानंतर बुमराहने उस्मान ख्वाजाला कोहलीकरवी झेलबाद केले, त्यानंतर पुढच्याच चेंडूवर स्टीव्ह स्मिथला एलबीडब्ल्यू आऊट केले. ख्वाजाने आठ धावा केल्या तर स्मिथ खातेही उघडू शकला नाही. अवघ्या 6.5 षटकात 19 धावसंख्येवर ऑस्ट्रेलियानं तीन विकेट गमावल्या होत्या.
त्यानंतरही ऑस्ट्रेलियाची पडझड कायम राहिली. आजच्या कसोटीव्दारे पदार्पण करणारा वेगवान गोलंदाज हर्षित राणानं ट्रॅव्हिस हेडने क्लीन बोल्ड करत कांगारूंना चौथा धक्का दिला. हेडला 11 धावा करता आल्या. त्याचवेळी मिचेल मार्शही सहा धावा करून मोहम्मद सिराजचा बळी ठरला. त्यानंतर सिराजने लॅबुशेनला एलबीडब्ल्यू केले. त्याला 52 चेंडूत दोन धावा करता आल्या. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सलाही खेळपट्टीवर जास्तवेळ घालवता आला नाही आणि भारतीय कर्णधार बुमराहने पंतकरवी त्याला झेलबाद केले. कमिन्स 5 चेंडूत तीन धावा करून माघारी परतला.
पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा ॲलेक्स कॅरी 19 धावांवर तर मिचेल स्टार्क 6 धावांवर खेळत होते. आतापर्यंत एकाही कांगारू फलंदाजाला 20 धावांच्या वर जाता आलेले नाही. जसप्रीत बुमराहने भारताकडून आतापर्यंत चार विकेट घेतल्या आहेत. बुमराहशिवाय मोहम्मद सिराजने दोन, तर हर्षित राणाला एक विकेट मिळाली.
तत्पूर्वी, तत्पूर्वी, भारताचा पहिला डाव 150 धावांवर आटोपला. टीम इंडियाचे 11 फलंदाज 50 षटकेही फलंदाजी करू शकले नाहीत. संपूर्ण संघ 49.3 षटकांत गडगडला. नितीश रेड्डी याने भारताकडून सर्वाधिक 41 धावा केल्या. याशिवाय ऋषभ पंतने 37 धावांची खेळी खेळली. तर कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत डावाची सलामी देण्यासाठी आलेला केएल राहुल 74 चेंडूत 3 चौकारांच्या मदतीने 26 धावा करून बाद झाला.
भारताची सुरुवात खराब झाली.यशस्वी जैस्वाल आणि तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला देवदत्त पडिक्कल हे फलंदाज खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतले. विराट कोहली पाच धावा करून तर ध्रुव जुरेल 11 धावा करून बाद झाला.अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरलाही चार धावा करता आल्या. पंत आणि नितीश यांनी सातव्या विकेटसाठी 48 धावांची भागीदारी केली, पण कमिन्सने ही भागीदारी तोडली आणि पंत बाद होताच भारताचा डाव 150 धावांवर आटोपला.
IND vs AUS 1st Test : शुभमन गिलच्या दुखापतीबाबत BCCIने दिले अपडेट; जाणून घ्या, मैदानात कधी परतणार..
हर्षित राणा सात धावा करून बाद झाला तर बुमराह आठ धावा करून बाद झाला. नितीशच्या रूपाने भारताने शेवटची विकेट गमावली. ऑस्ट्रेलियाच्या सर्व वेगवान गोलंदाजांनी 10 बळी घेतले. ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवूडने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. तर मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स आणि मार्श यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.





