IND vs AUS 1st Test : भारताचा रनमशिन ‘कोहली’चे विक्रमी शतक, ब्रॅडमन-सचिनसह दिग्गजांना ‘या’ बाबतीत टाकले मागे…

IND vs AUS 1st Test Day 3 : भारतीय फलंदाज विराट कोहलीने आपला खराब फॉर्म मागे टाकत ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थ येथे खेळल्या जात असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात शतक झळकावले आहे. पहिल्या डावात पाच धावा करून बाद झालेल्या कोहलीने दुसऱ्या डावात चांगली कामगिरी करत आपल्या कसोटी कारकिर्दीतील 30 वे शतक झळकावले. कोहलीपूर्वी यशस्वी जैस्वालनेही भारतासाठी या सामन्यात शतक झळकावले.
कोहलीने सचिनला टाकले मागे…
कोहली त्याच्या शतकासह ऑस्ट्रेलियात सर्वाधिक कसोटी शतके झळकावणारा भारतीय फलंदाज बनला आहे. कोहलीचे हे ऑस्ट्रेलियातील सातवे कसोटी शतक आहे, तर सचिनने त्याच्या कारकिर्दीत ऑस्ट्रेलियात सहा शतके झळकावली होती. एवढेच नाही तर सहा वर्षांनंतर कोहलीचे ऑस्ट्रेलियातील कसोटी फॉर्मेटमधील हे पहिले शतक आहे. यापूर्वी त्याने 2018 मध्ये ऑस्ट्रेलियन भूमीवर या फॉरमॅटमध्ये शेवटचे शतक झळकावले होते.
Raw emotions from the dugout as Virat Kohli reaches his 30th Test TON!
This one’s a treat for the eyes 🤗#TeamIndia | #AUSvIND | @imVkohli pic.twitter.com/PD2kCIgvRk
— BCCI (@BCCI) November 24, 2024
सुनील गावसकरांनाही सोडले पिछाडीवर…
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली याने 81 आंतरराष्ट्रीय शतक साकार करताना ऑस्ट्रेलियाविरुद्धचे 7 वे शतक पूर्ण केले. हे त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धचे होम व अवे मिळून 9 वे कसोटी शतक ठरले. परदेशी भूमीवर साकार झालेले हे त्याने सातवे शतक (विरुद्ध ऑस्ट्रेलिया) ठरले तर यापूर्वी ही कामगिरी सुनील गावसकर 7 (विरुद्ध वेस्ट इंडिज) यांनी केली होती.
सर्वाधिक शतके झळकावणारा परदेशी खेळाडू
हे कोहलीचे कारकीर्दीतील30 वे शतक ठरले. त्याने गेल्या सव्वा वर्षाचा शतकांचा दुष्काळ संपवला. विराट कोहली आता ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारा परदेशी खेळाडू ठरला आहे. कोहलीने जॅक हॉब्सचा 9 शतकांचा विक्रम मोडला. कोहलीच्या नावावर आता ऑस्ट्रेलियात कांगारू संघाविरुद्ध तिन्ही फॉरमॅटमध्ये 10 शतके आहेत.
डॉन ब्रॅडमनचा विक्रम काढला मोडीत…
इतकेच नाही तर कोहलीने सर्वाधिक कसोटी शतके झळकावण्याच्या बाबतीत महान ऑस्ट्रेलियन फलंदाज डॉन ब्रॅडमनलाही मागे टाकले आहे. ब्रॅडमनने 29 कसोटी शतके झळकावली होती तर कोहलीच्या नावावर आता 30 कसोटी शतके झाली आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 100 शतके करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. या यादीत विराट कोहली 81 शतकांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग 71 शतकांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
ऑस्ट्रेलियात कोहलीचा रेकॉर्ड चांगला…
कोहलीचा ऑस्ट्रेलियात चांगला रेकॉर्ड आहे आणि त्याने 14 सामन्यात 56.03 च्या सरासरीने 1457 धावा केल्या आहेत. कोहलीने या काळात सात शतके आणि चार अर्धशतके झळकावली आहेत. एवढेच नाही तर 2011-12 आणि 2014-15 च्या दौऱ्यांमध्ये तो भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत कोहलीची सर्वोत्कृष्ट कामगिरी 2014-15 दौऱ्यात होती जेव्हा त्याने चार सामन्यांत 86.50 च्या सरासरीने 692 धावा केल्या, ज्यात चार शतके आणि एक अर्धशतक होते.





