IND vs AUS 1st Test : माझ्या दृष्टीने यशस्वी सामनावीर – कर्णधार बुमराह

IND vs AUS 1st Test (Yashasvi Jaiswal) : – बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीची सुरुवात भारतासाठी चांगली झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना 22 ते 25 नोव्हेंबर दरम्यान पर्थ येथे खेळला गेला. पर्थ कसोटी सामना 295 धावांनी जिंकण्यात भारताला यश आले. या सामन्यात बुमराहनं एकूण 8 गडी बाद करत सामनावीराचा किताब पटकावला.
भारतीय कर्णधार जसप्रीत बुमराहने यशस्वी जयस्वालचे पर्थमधील शतक हे त्याची सर्वोत्तम कसोटी खेळी असल्याचे वर्णन केले. कर्णधार म्हणाला की,” त्याच्या दृष्टीने यशस्वी हाच सामनावीर आहे. त्याने विराट कोहलीचेही कौतुक केले.” भारताच्या दुसऱ्या डावात यशस्वीने 161 आणि कोहलीने नाबाद 100 धावा केल्या. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियाचा 295 धावांनी पराभव केला. संघाने 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
सामन्यानंतर पत्रकार परिषदेत बुमराह म्हणाला, ‘मला सामनावीराचा पुरस्कार द्यायचा असता तर मी तो यशस्वी जैस्वालला दिला असता. माझ्या दृष्टीने ही त्याची सर्वोत्तम कसोटी खेळी होती. कारण तो आक्रमक खेळ खेळतो, पण त्याने ज्या प्रकारे खराब चेंडू सोडला आणि बराच वेळ तग धरून ठेवला त्यामुळे आम्हाला खरोखर मदत झाली.
तो पुढे म्हणाला, ‘विराट कोहलीला आमची गरज नाही, आम्हाला त्याची गरज आहे. तो अनुभवी खेळाडू आहे. त्याचा हा चौथा किंवा पाचवा ऑस्ट्रेलियन दौरा आहे. त्याला त्याचा खेळ चांगलाच माहीत आहे.
बुमराह म्हणाला, “हा माझ्यासाठी खूप खास विजय आहे. कर्णधार म्हणून हा माझा पहिला कसोटी विजय आहे. आमच्यावर दबाव होता पण सर्वांनी जबाबदारी सांभाळली आणि संघाने पुनरागमन केले. केएल राहुल ज्या प्रकारे फलंदाजी करत आहे त्यामुळे आनंदी आहे.”





