Border-Gavaskar Trophy 2024/25 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला आजपासून म्हणजेच 22 नोव्हेंबरपासून पर्थमध्ये सुरुवात होत आहे. दोन्ही संघांसाठी ही मालिका महत्त्वाची असून जागतिक कसोटी स्पर्धेच्या अंतिम फेरीत कोणता संघ पोहोचणार हे स्पष्ट होणार आहे.भारताला किमान चार कसोटी जिंकणे आवश्यक आहे. याशिवाय संघ एकही सामना हरणार नाही याचीही काळजी घ्यावी लागेल.
तत्पूर्वी, भारतीय कर्णधार जसप्रीत बुमराहने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि भारताचा पहिला डाव अवघ्या 150 धावांवर आटोपला. टीम इंडियाचे 11 फलंदाज 50 षटकेही फलंदाजी करू शकले नाहीत. संपूर्ण संघ 49.3 षटकांत गडगडला. नितीश रेड्डी याने सर्वाधिक 41 धावा केल्या. याशिवाय ऋषभ पंतने 37 धावांची खेळी खेळली. तर कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत डावाची सलामी देण्यासाठी आलेला केएल राहुल 74 चेंडूत 3 चौकारांच्या मदतीने 26 धावा करून बाद झाला.
भारताची सुरुवात खराब झाली.यशस्वी जैस्वाल आणि तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला देवदत्त पडिक्कल हे फलंदाज खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतले. विराट कोहली पाच धावा करून तर ध्रुव जुरेल 11 धावा करून बाद झाला.अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरलाही चार धावा करता आल्या. पंत आणि नितीश यांनी सातव्या विकेटसाठी 48 धावांची भागीदारी केली, पण कमिन्सने ही भागीदारी तोडली आणि पंत बाद होताच भारताचा डाव 150 धावांवर आटोपला.
हर्षित राणा सात धावा करून बाद झाला तर बुमराह आठ धावा करून बाद झाला. नितीशच्या रूपाने भारताने शेवटची विकेट गमावली. ऑस्ट्रेलियाच्या सर्व वेगवान गोलंदाजांनी 10 बळी घेतले. ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवूडने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. तर मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स आणि मार्श यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.