मंचर, (प्रतिनिधी) – आंबेगाव तालुक्यातील मंचर आणि एकलहरे येथे चोरी झाली आहे. ३५ हजार रुपयांची रोकड आणि मोटरसायकल चोरून नेल्याची घटना घडली आहे. अज्ञात चोरट्यांच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
एकलहरे ता.आंबेगाव येथे किगा आईस्क्रीम नावाच्या दुकानात चोरी झाली असून अज्ञात चोरट्याने दुकानाचे कुलूप तोडून दुकानात प्रवेश करत दुकानातील ३० हजार रूपयांची रोख रक्कम व ५ हजार रुपये किमतीचा रेडमी कंपनीचा मोबाईल असा ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला असल्याची घटना दि. २८ रोजी रात्री ११:४५ ते दिनांक २९ रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या दरम्यान घडली आहे.
याबाबत राम राहुल चिंबळकर यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. तसेच मंचर गावच्या हद्दीत सुंदर सोसायटी इमारतीच्या पार्किंगमधून हँडल लॉक केलेली ३० हजार रुपये किमतीची हिरो होंडा कंपनीची डीलक्स एम.एच १४ ई.व्ही ११९८ ही दुचाकी ही अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे.
याबाबत प्रदीप दिलीप पडवळ रा. महाळुंगे पडवळ यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांवर मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण फुगे यांच्या मार्गदर्शनाखाली मंचर पोलीस पुढील तपास करत आहे.