नगर – नगर कृषि उत्पन्न बाजार समितीत शरद रोडे या शेतकऱ्याच्या मुगाला उच्चांकी भाव मिळाला. बाजार समितीमधील भुसार बाजारात प्रति क्विंटल 11 हजार 111 रुपये या उच्चांकी दराने लिलाव झाला. उच्च प्रतिच्या मुगाला एवढा बाजारभाव मिळण्याची ही बाजार समितीमध्ये पहिलीच वेळ आहे.
भुसार बाजारामध्ये भागवत कोथंबिरे यांच्या आडतीवर झालेल्या लिलावामध्ये शरद रोडे यांच्या उच्च प्रतिच्या मुगाला 11 हजार 111 असा उच्चांकी दर मिळाला. दरम्यान बाजार समितीच्या भुसार बाजारामध्ये शेतकऱ्यांचा 110 क्विंटल मुग विक्रीसाठी आलेला होता. त्यास प्रतवारीनुसार 7 हजार ते 9 हजार रुपये प्रति क्विंटल असा सरासरी बाजार भाव मिळाला असल्याचे बाजार समितच्या वतीने सांगण्यात आले. शेतकऱ्यांनी आपला शेतमाल विक्री करीता बाजार समिती येथे आणून जास्त दराचा फायदा घ्यावा असे आवाहन सभापती भाऊसाहेब बोठे यांनी केले.