SMAT 2024 : रहाणेच्या स्फोटक खेळीमुळे मुंबई Final मध्ये, उपांत्य फेरीत हार्दिकच्या संघास केलं पराभूत…

Syed Mushtaq Ali Trophy 2024 (BDA vs MUM 1st Semi-Final) : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024 चा पहिला उपांत्य सामना 13 डिसेंबर रोजी खेळला गेला. हा उपांत्य सामना बडोदा आणि मुंबई यांच्यात पार पडला, जो बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला.
अजिंक्य रहाणे आणि कर्णधार श्रेयस अय्यरच्या स्फोटक फलंदाजीमुळे मुंबईने सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत बडोद्याचा 6 गडी राखून पराभव केला. या विजयासह मुंबईने अंतिम फेरीतील आपले स्थान पक्के केले आहे. या सामन्यात कृणाल पांड्याच्या नेतृत्वाखाली बडोदा संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 7 गडी गमावून 158 धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबई संघाने केवळ 4 गडी गमावून 16 चेंडू बाकी(17.2 षटक) असताना 164 धावा करत सामना जिंकला. विशेष म्हणजे मुंबईच्या या विजयाचा हिरो 36 वर्षीय अजिंक्य रहाणे ठरला.
रहाणेची स्फोटक खेळी….
मुंबईसाठी पृथ्वी शॉ आणि अजिंक्य रहाणे सलामीला आले. शॉ 8 धावा करून बाद झाला. मात्र अजिंक्य रहाणेला रोखण्यात बडोदा संघ पूर्णपणे अपयशी ठरला. अजिंक्य रहाणेने 175 च्या स्ट्राईक रेटने 56 चेंडूत 98 धावा केल्या, ज्यात 11 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता.
जिंकलस भावा! 🫡❤️
Missed the century, but Ajinkya Rahane made 9️⃣8️⃣ even more unforgettable 🙌
Keep watching the #IDFCFirstBankSyedMushtaqAliTrophy, streaming on #JioCinema & #Sports18Khel 👈#JioCinemaSports pic.twitter.com/CrqascTnFj
— JioCinema (@JioCinema) December 13, 2024
उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यातही या भारतीय फलंदाजाने शानदार फलंदाजी करत 84 धावांची शानदार खेळी केली होती. मुंबईकडून खेळणाऱ्या अजिंक्य रहाणेने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या चालू हंगामात 8 सामन्यांमध्ये 432 हून अधिक धावा केल्या आहेत आणि या काळात त्याचा स्ट्राइक रेट 170 च्या आसपास आहे.
कसा झाला सामना….
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024 च्या पहिल्या उपांत्य सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या बडोद्याच्या एकाही फलंदाजाला 40 पेक्षा अधिक धावा करता आल्या नाहीत. स्टार फलंदाज हार्दिक पांड्या केवळ 5 धावा करून बाद झाला. शाश्वत रावतने 29 चेंडूत 33 धावा, कर्णधार कृणाल पांड्याने 24 चेंडूत 30 धावा आणि शिवालिक शर्माने 24 चेंडूत 36 धावा तर शेवटी अतीत सेठनं 14 चेंडूत 22 धावा करत बडोदा संघाला 20 षटकात 158 धावसंख्येपर्यंत मजल मारून दिली. मुंबईकडून सुर्यांश शेडगेने दोन षटकांत 11 धावा देत सर्वाधिक दोन बळी घेतले. तर या सामन्यात मुंबईसाठी शार्दुल ठाकूर सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्यानं चार षटकांत 46 धावा देत 1 गडी बाद केला.
Women’s Jr. Asia Cup 2024 : टीम इंडियाची उपांत्य फेरीत धडक, थायलंडचा केला दारूण पराभव…
प्रत्युत्तरात मुंबई संघाची सुरुवात चांगली झाली नाही. पृथ्वी शॉ केवळ 8 धावांवर बाद झाल्यानंतर अजिंक्य रहाणे आणि श्रेयस अय्यर यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी 56 चेंडूत 88 धावांची भागीदारी झाली. 30 चेंडूत 46 धावा करून श्रेयस अय्यर बाद झाला. यानंतर अजिंक्य रहाणे आणि सूर्यकुमार यादव यांच्यात 27 चेंडूत 40 धावांची भागीदारी झाली, ज्यामध्ये सूर्यकुमारच्या केवळ एक धावेचा समावेश होता. विजयासाठी 1 धावेची गरज असताना अंजिक्य रहाणे (98) आणि सूर्यकुमार (01) यादव बाद झाले. त्यानंतर सुर्यांश शेडगे यानं षटकार ठोकत मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. मुंबई संघाने 17.2 षटकात 4 गडी गमावून 164 धावा केल्या आणि सामना 6 विकेटने जिंकून अंतिम फेरीतील आपले स्थान पक्के केले.





