SMAT 2024 : रिंकू सिंगचा संघ उपांत्यपूर्व फेरीत दाखल; आंध्रचा 4 गडी राखून केला पराभव…

Syed Mushtaq Ali Trophy 2024 (UP vs Andhra Pre Quarter Final) :- सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024 च्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात यूपीने आंध्रचा 4 गडी राखून पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. भुवनेश्वर कुमारच्या नेतृत्वाखालील या संघासाठी रिंकू सिंग 27 धावा करून नाबाद माघारी परतला, पण विपराज निगम खूपच स्फोटक ठरला. शेवटच्या षटकांमध्ये विप्रजने अवघ्या 8 चेंडूत 27 धावांची खेळी करत यूपीच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले.
या प्री-क्वार्टर फायनल सामन्यात उत्तर प्रदेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भुवनेश्वर कुमार, मोहसीन खान आणि शिवम मावी या त्रिकुटाने 38 धावसंख्येपर्यंत आंध्रचे तीन बळी घेतल्याने हा निर्णय चांगलाच ठरला. कर्णधार रिकी भुई आणि अविनाश यांनी काही काळ डाव सांभाळला, पण तेही जास्त वेळ क्रीझवर टिकू शकले नाहीत आणि धावसंख्या 86 होईपर्यंत अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला होता. आंध्रकडून एस प्रसाद सर्वाधिक 34 धावा करून नाबाद परतला. शेवटच्या षटकांमध्ये के शशिकांतने 8 चेंडूत 23 धावा करत आंध्रला 150 धावांचा टप्पा पार करून दिला. अशाप्रकारे आंध्रनं 20 षटकात 6 बाद 156 धावसंख्येपर्यतं मजल मारली होती.
यूपीला 157 धावांचे लक्ष्य मिळाले होते. त्यांनी हे लक्ष्य 6 गडी गमवताना आर्यन जुयाल आणि करण शर्मा यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली आणि दोघांनी 70 धावांची भागीदारी केली. मात्र गोलंदाज के. सुदर्शनने डावाच्या नवव्या षटकात आर्यन आणि करण या दोघांनाही बाद करून आंध्रला सामन्यात परत आणले. प्रियम गर्ग आणि नितीश राणा अनुक्रमे 10 आणि 4 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले. येथून रिंकू सिंगने एक बाजू संभाळून धरली, आणि संयमी खेळी करताना 22 चेंडूत नाबाद 27 धावा केल्या. समीर रिझवी काही विशेष करू शकला नाही, पण विपराज निगमने 8 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकारासह नाबाद 27 धावा केल्या आणि संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
आता उपांत्यपूर्व फेरीत यूपीचा सामना दिल्लीशी होईल, ज्यांनी क-गटात अव्वल स्थान मिळवून थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. आता 11 डिसेंबरला उपांत्यपूर्व फेरीत यूपी आणि दिल्ली आमने-सामने असतील.





