SMAT 2024 : शमीच्या अष्टपैलू खेळाने बंगाल उपांत्यपूर्व फेरीत दाखल, चंदीगडचा अवघ्या 3 धावांनी केला पराभव…

Syed Mushtaq Ali Trophy 2024 :- मोहम्मद शमीच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर बंगालने चंदीगड विरुद्ध 3 धावांनी विजय मिळवत सय्यद मुश्ताक अली करंडक टी-20 स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. आजच्या खेळीत शमीने गोलंदाजी करताना 4 षटकांच्या स्पेलमध्ये केवळ 25 धावा दिल्या आणि 1 फलंदाज बाद केला. त्याने आपल्या 24 चेंडूंपैकी तब्बल 13 चेंडू निर्धाव टाकले. तर फलंदाजीमध्ये शमीने 17 चेंडूत नाबाद 32 धावांची खेळी केली.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बंगालने 20 षटकांत 9 बाद 159 धावा केल्या. यादरम्यान मोहम्मद शमीने संघासाठी दमदार कामगिरी केली. शमीने 17 चेंडूंचा सामना करत नाबाद 32 धावा केल्या. या खेळीत त्याने 3 चौकार आणि 2 षटकार मारले. बंगालकडून करण लालनेही चांगली खेळी केली. त्याच्या खेळीत त्यानं 25 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारासह 33 धावा केल्या. हृतिक चॅटर्जीने 12 चेंडूत 28 धावा केल्या. त्याने 3 षटकार आणि 2 चौकार मारले. चंदीगडकडून गोलंदाजीत जगजीत सिंहनं 4 षटकात 21 धावा देत 4 तर राज बावानं 4 षटकात 27 धावा देत 2 गडी बाद केलं. तर निखील शर्मा,अर्मित लबाना अन् भागमेंदर लाथर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरात चंदीगड संघाला 20 षटकांत 9 गडी गमावून केवळ 156 धावा करता आल्या. त्याच्याकडून राज बावाने सर्वाधिक 32 धावा केल्या. 20 चेंडूंचा सामना करताना त्याने 3 चौकार आणि 1 षटकार लगावला. प्रदीप यादवने 19 चेंडूंचा सामना करत 27 धावा केल्या. कर्णधार मनन वोहराने 23 धावांची खेळी खेळली. अखेरीस संदीप शर्मा (0) आणि निशंक बिर्ला(4) नाबाद राहिले. बंगालकडून गोलंदाजीत सायन घोषने 4 षटकात 30 धावांत चार बळी घेतले. याव्यतिरिक्त कनिष्क सेठनं 2 तर शमी आणि शाहबाज अहमदनं प्रत्येकी 1 गडी बाद केला.
Bengal enter quarterfinals 🙌
What a thriller! 🔥
Sayan Ghosh defends 11 off the final over to win it for Bengal 👏
They beat Chandigarh by 3 runs, defending 159.#SMAT | @IDFCFIRSTBank
Scorecard ▶️ https://t.co/u42rkbUfTJ pic.twitter.com/ZjwGJT0gh8
— BCCI Domestic (@BCCIdomestic) December 9, 2024
शमीनं गोलंदाजीने पाडली छाप…
शमीने आजच्या लढतीत आपल्या गोलंदाजीने छाप पाडली. शमीने पहिल्या स्पेलच्या तिसऱ्या चेंडूवर सलामीवीर अर्सलान झेडचा त्रिफळा उडवला. मध्य प्रदेशविरुद्धच्या पहिल्या रणजी सामन्यापेक्षा तो खूपच तंदुरुस्त दिसत होता. त्याने मध्य प्रदेश विरुद्ध (रणजी सामना) 42.3 षटके टाकली पण तेव्हा त्याची गोलंदाजी आजच्यासारखी भेदक नव्हती. त्याने सुमारे 135 किलोमीटर प्रतितास वेगाने गोलंदाजी केली आणि यादरम्यान त्याच्या एका चेंडूचा वेग ताशी 139 किलोमीटरवर पोहोचला.
दुखापतीतून परतल्यानंतर शमीने एक रणजी आणि आठ टी-20 (सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी) सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने गोलंदाजीत 64 षटकांत 16 बळी टिपले आहेत. या लढती टी-20 असल्या तरी शमी भारतीय संघात पुनरागमन करण्याच्या मार्गावर असल्याचे दिसते. एका कसोटी सामन्यात, त्याला एका दिवसात तीन किंवा चार स्पेलमध्ये एकूण 20 षटके टाकावी लागतील. गोलंदाजीसोबतच क्षेत्ररक्षणासाठीही दिवसभर मैदानावर राहावे लागणार आहे.
IND vs AUS 2nd Test : सिराज-हेडला भर मैदानात वाद घालणं पडलं महागात, ICC ने केली मोठी कारवाई….
निवडकर्त्यांना मोहम्मद शमी पूर्ण तंदुरुस्त झाल्यावर संघात सामील करून घ्यायचे आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीकडून अजूनही पूर्णपणे तो फिट असल्याचे प्रमाणपत्र उपलब्ध झालेले नाही. सध्याच्या घडीला तरी त्याला गोलंदाजी करताना कोणतीही अडचण आलेली नाही. मात्र दिवसाचा खेळ संपल्यानंतर त्याच्या गुडघ्याला थोडी सूज आल्याचे दिसून आले आहे. ऍडलेड कसोटी नंतर बोलताना रोहित शर्माने याच गोष्टीचा उल्लेख केला होता.





