SMAT 2024 : उपांत्यपूर्व फेरीत शमीची निराशाजनक कामगिरी, हार्दिकच्या बडोद्याचा बंगालवर एकतर्फी विजय….

Syed Mushtaq Ali Trophy 2024 (Baroda vs Bengal, Quarter Final1) : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या पहिल्या उपांत्यपूर्व फेरीत टीम इंडियाचे दोन दिग्गज खेळाडू आमनेसामने आले. हार्दिक पांड्या बडोदा संघात होता आणि त्याचा प्रतिस्पर्धी मोहम्मद शमी बंगाल संघात खेळत होता.
पण या दोघांपैकी सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीत बडोदाविरुद्धच्या सामन्यात वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी छाप पाडू शकला नाही, त्यामुळे बंगालला 41 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. प्रथम फलंदाजी करताना शाश्वत रावतच्या 40 धावांच्या खेळीच्या जोरावर बडोद्याने 20 षटकांत सात गड्यांच्या मोबदल्यात 172 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात बंगालचा डाव शाहबाद अहमदच्या अर्धशतकी खेळीनंतरही 18 षटकांत 131 धावसंख्येवरच आटोपला. या पराभवासह बंगालचा संघही सय्यद मुश्ताक टी-20 स्पर्धेतून बाहेर पडला.
लक्ष्याचा पाठलाग करताना शाहबाजने 36 चेंडूंत तीन चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 55 धावांची खेळी केली. शाहबाजने बंगालचा डाव पुन्हा रुळावर आणण्याचा प्रयत्न केला पण त्याला कोणाचीही साथ मिळाली नाही. या सामन्यात बंगालची फलंदाजी खूपच खराब झाली. बडोद्यातर्फे हार्दिक पंड्या, लुकमान मेरिवाला आणि अतित शेठ यांनी प्रत्येकी तीन बळी घेत संघाच्या विजयात महत्वपूर्ण योगदान दिलं.
शमीची निराशाजनक कामगिरी…
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्याच्या चर्चा असताना देशांतर्गत स्पर्धेत प्रभावी कामगिरी करणाऱ्या शमीला बडोद्याविरुद्ध विशेष काही करता आले नाही. त्याने दोन विकेट घेतल्या, परंतु चार षटकांच्या स्पेलमध्ये त्याने 43 धावा दिल्या आणि या दरम्यान त्याची इकॉनोमी 10.80 होती.
शमीची कामगिरीही चर्चेत आहे कारण अनुभवी वेगवान गोलंदाज ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या किमान शेवटच्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघात सामील होण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहे. या सामन्यापूर्वी शमीने 8 सामन्यात 7.8 च्या इकॉनॉमी रेटने 11 बळी घेतले होते. पण शमीसाठी बुधवार काही खास नव्हता. त्याने पहिल्याच षटकात दोन वाइड्सने सुरुवात केली आणि उर्वरित स्पेलमध्ये तो त्याच्या गोलंदाजीवर नियंत्रण ठेवू शकला नाही.
पांड्याने केली दमदार कामगिरी…
हार्दिक पांड्याबद्दल सांगायचे तर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याने अप्रतिम कामगिरी केली आहे. या अष्टपैलू खेळाडूने आतापर्यंत टूर्नामेंटमधील 6 सामन्यात 60 पेक्षा जास्त सरासरीने 241 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 2 अर्धशतकांचा समावेश आहे. पंड्याचा स्ट्राईक रेट 199.17 आहे. या खेळाडूने गोलंदाजीत 5 विकेट्स घेतल्या आहेत, त्यापैकी त्याने बाद फेरीत तीन विकेट घेतल्या आहेत.





