SMAT 2024 : मोहम्मद शमीचा मोठा पराक्रम, टी-20 मध्ये पूर्ण केलं ‘दुहेरी शतक’; ‘या’ विशेष यादीत मिळवलं स्थान…

Mohammed Shami : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024 चा पहिला उपांत्यपूर्व सामना बडोदा आणि बंगालच्या संघांमध्ये खेळला गेला. या सामन्यात बडोदा संघाने 41 धावांनी विजय मिळवला. म्हणजेच भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या संघाला पराभवाला सामोरे जावे लागले.
दुखापतीतून पुनरागमन केल्यानंतर मोहम्मद शमी देशांतर्गत क्रिकेटमध्ये सतत खेळत आहे, जेणेकरून तो टीम इंडियामध्ये आपले स्थान पक्के करू शकेल. अशा परिस्थितीत या सामन्यादरम्यान सर्वांच्या नजरा शमीवर खिळल्या होत्या. बीसीसीआयही शमीच्या फिटनेसवर बारीक लक्ष देत आहे. शमीला आपल्या संघाला विजय मिळवून देता आला नसला तरी त्याने या सामन्यात एक मोठी कामगिरी केली आहे.
बडोद्याविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात खेळताना मोहम्मद शमीने 4 षटकांत 43 धावा दिल्या, म्हणजेच तो खूप महागडा ठरला. मात्र, या काळात त्याने 2 बळीही घेतले. या दोन विकेट्ससह शमीने टी-20 क्रिकेटमध्ये 200 विकेट्सही पूर्ण केल्या. यासह टी-20 क्रिकेटमध्ये वेगवान गोलंदाज म्हणून 200 विकेट घेणारा शमी 8वा भारतीय आहे. शमीपूर्वी भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल, जयदेव उनाडकट, संदीप शर्मा, अर्शदीप सिंग आणि उमेश यादव यांनी ही कामगिरी केली आहे.
SMAT 2024 : उपांत्यपूर्व फेरीत शमीची निराशाजनक कामगिरी, हार्दिकच्या बडोद्याचा बंगालवर एकतर्फी विजय….
शमीने आतापर्यंत 165 टी-20 सामने खेळले आहेत, ज्यापैकी तो टीम इंडियासाठी 23 सामने खेळला आहे. या कालावधीत शमीने 8.19 च्या इकॉनॉमीने धावा दिल्या आहेत आणि 201 बळी घेतले आहेत. त्याने त्याच्या टी-20 करिअरमध्ये 3 वेळा एका डावात 4 विकेट घेण्याचा पराक्रमही केला आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय टी-20 तसेच लिस्ट ए आणि फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 200 विकेट घेणारा शमी हा भारताचा तिसरा खेळाडू आहे. शमीशिवाय या यादीत फक्त भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराहची नावे आहेत.





