पुणे – मेट्रो, महापालिकेने केलेली विकासकामे, अनावश्यक बांधकामांमुळे शहरात पावसाळ्यात पाणी साचणारी तब्बल 140 नवीन ठिकाणे तयार झाली आहेत. येथील पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक उपाय योजना करण्यात येणार असून त्यासाठीचा अहवाल पुढील आठ दिवसांत सादर करण्याचे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी प्रशासनास दिले आहेत.
आयुक्तांनी पावसाळापूर्व कामांसाठी दोन दिवसांपूर्वी बैठक घेतली. यात ही माहिती देण्यात आली. पथ, ड्रेनेज, आपत्ती व्यवस्थापन, पाणीपुरवठा तसेच बांधकाम विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. या अहवालानुसार या ठिकाणी पावसाळ्यापूर्वी तातडीची कामे केली जाणार असून त्यासाठीची निविदा प्रक्रिया तातडीने करण्याचा निर्णय बैठकीत झाला.
गेल्या दोन वर्षांत पाणी साठणाऱ्या ठिकाणांचा आढावा बैठकीत घेण्यात आला. शहरात पाणी साठणारी 280 ठिकाणे होती. त्यातील जवळपास 80 टक्के ठिकाणांवर कामे केली असून, पुन्हा पाणी साचले नसल्याचे बैठकीत सांगण्यात आले. मागील वर्षी नव्याने 140 ठिकाणी पाणी साठल्याचे सांगण्यात आले. प्रामुख्याने मेट्रो मार्ग, नाल्यांवर झालेले अतिक्रमण, रस्त्याच्या कडेला पावसाळी वाहिन्या नसणे, रस्त्यावरील चेंबर साफ न करणे, पदपथांची नव्याने करण्यात आलेल्या कामात पावसाळी वाहिन्या न टाकणे, चुकीच्या पद्धतीने डांबरीकरणामुळे सखल भाग तयार होणे, रस्त्याकडेला पाणी वाहून जाणाऱ्या जागेवर अतिक्रमण यांमुळे पाणी साचत असल्याचे सांगण्यात आले.
पाणी साठणारे काही नवीन भाग
कर्वे रस्ता, डेक्कन, फर्गसन रस्ता, जंगली महाराज रस्ता, राजारामपूल, कर्वेपुतळा परिसर, गुंजन चौक, फिनिक्स मॉल, पठानशाह बाबा दर्गा, फुलेनगर आरटीओ, संतोष हॉल, विठ्ठलवाडी, स्वारगेट, कोंढवा-हडपसरमधील काही भाग, मगरपट्टा रस्ता, धायरी परिसर, वारजे चौक, एनडीए रस्त्यावरील काही भागांत पाणी तुंबण्याची शक्यता आहे.