पुणे – मध्यवर्ती पेठांसाठी टीपी स्किम, शहरातील गणेशोत्सवाची वैभवशाली परंपरा उलगडणारे संग्रहालय, राजेंद्रनगर आणि सानेगुरुजी वसाहतीचा पुनर्विकास अशा विकासकामांद्वारे कसबा मतदारसंघात पायाभूत सुविधा सक्षम करण्यावर भर अशी आश्वासने असलेला भाजप-मित्रपक्षाचे कसबा विधानसभेचे उमेदवार हेमंत रासने यांच्या “निर्धारनामा’ म्हणजेच जाहीरनाम्याचे प्रकाशन बुधवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. शहराध्यक्ष जगदीश मुळीक, उमेदवार हेमंत रासने, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, खासदार धनंजय महाडिक, मुरलीधर मोहोळ, विक्रांत पाटील, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, धीरज घाटे, राजेश पांडे, गणेश बिडकर, दिलीप कांबळे, योगेश टिळेकर, मेधा कुलकर्णी, प्रमोद कोंढरे यावेळी उपस्थित होते. नदीसुधारणा प्रकल्पाला गती देत कसब्याचा चेहरामोहरा बदलणार, पुढील तीन महिन्यांत मेट्रोचा पहिला टप्पा पूर्ण होणार असल्याने कसबा पेठ आणि मध्यवर्ती भागांत वाहतुकीचा सक्षम पर्याय उपलब्ध होणार आहे, असे यावेळी सांगण्यात आले. “निर्धारनामा’तील ठळक आश्वासने राजेंद्रनगर, सानेगुरुजी वसाहतींचा वेगवान पुनर्विकास. सुपरहिट ठरलेल्या “पुण्यदशम्’ बससेवेचा विस्तार. सरकारी कार्यालयांत प्रतीक्षालय. स्वच्छतागृह उभारणी, मनपा रुग्णालयांचे अत्याधुनिक सुविधांसह सक्षमीकरण स्थानिकांना विश्वासात घेऊन महात्मा फुले मंडईचे नव्या गरजांनुसार विकसन. भिडेवाड्याचा तातडीने पुनर्विकास करत फुले दाम्पत्याचे स्मारक, कसब्यातील तालमींचे नूतनीकरण आणि आधुनिकीकरण केले जाईल, आदी आश्वासने भाजपकडून देण्यात आली आहेत. पुणे महापालिकेत आम्ही दीर्घकालीन विकासावर लक्ष देत सरकारच्या धोरणांचा लाभ घेत काम करून दाखवले. कसबा हा अत्यंत दाट वस्तीचा भाग आहे. येथील वाहतूककोंडी सोडवायची असेल, मुक्तपणाने श्वास घेण्याची परिस्थिती निर्माण करायची असेल तर टीपी स्कीमद्वारे विकास करण्याची आवश्यकता आहे. नागरिकांच्या मनात विश्वास निर्माण करून या दिशेने पावले टाकण्याचा निर्धार आहे. – हेमंत रासने, उमेदवार, भाजप