फुरसुंगी – महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या गावांमध्ये लोकोपयोगी उपक्रमांसाठी अनेक ठिकाणी जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. परंतु, समाविष्ट गावांतील गायरान व सरकारी जागा ताब्यात घेण्याची प्रक्रियेकडे पालिकेचे दुर्लक्ष असल्याने अशा जागांवर अतिक्रमणे वाढली आहेत. यातून महसूल बुडत असताना या जागांवर अतिक्रमण वाढण्याचा धोकाही आहे. पालिका प्रशासनाने लोकोपयोगी योजनांसाठी आरक्षित केलेल्या जागा ताब्यात घेणे महत्त्वाचे ठरत असल्याची चर्चा संबंधीत गावांत आहे.
कोंढवा-येवलेवाडी, कोंढवा-रामटेकडी, हडपसर-मुंढवा या क्षेत्रिय कार्यालया अंतर्गत येणाऱ्या भागांमध्ये उद्यान, बाल उद्यान, खेळाचे मैदान, नाना-नानी पार्क, पाण्याची टाकी, जलशुध्दीकरण प्रकल्प, आरोग्य केंद्र, भाजी मंडई, दवाखाने, क्रीडांगण असे विविध प्रकल्प राबविण्यासाठी अनेक ठिकाणी पालिकेने जागा आरक्षित केलेल्या आहेत. या जागांवर काही ठिकाणी जागा आरक्षितबाबतचे फलक आहेत तर काही ठिकाणी फलकच गायब असल्याने अशा जागांवर अतिक्रमण वाढू लागली आहेत.
महापालिकेच्या या जागा मोक्यांच्या ठिकाणी असल्याने त्या जागांवर व्यावसायिक (दुकाने) अतिक्रमण अधिक प्रमाणात वाढले आहे. अनेक ठिकाणी तात्पुरते शेड उभारून तेथे दुकाने थाटण्यात आली आहेत. पालिका प्रशासनाकडून यासंदर्भात कारवाईच होत नसल्याने याचे प्रमाण वाढत आहे.
मिळकत कर वुसली अन्…
महापालिकेत समाविष्ट गावांतील गायरान व सरकारी जागांवर अतिक्रमणे झालेली असताना पालिकाप्रशासन मात्र जाणीवपूर्वक डोळेझाक करीत आहे. सामान्य नागरिकांकडून वाढीव मिळकत कर वसुलीकरताना नियमांवर बोट ठेवताना पालिकेच्या जागांवर अतिक्रमण करणाऱ्यांवर प्रशासन कारवाई करीत नाही, हा कुठला प्रकार? असा आता समाविष्ट गावांतील नागरिकांकडून केला जात आहे.
…अन्यथा जागेची अडचण
महापलिकेत समाविष्ट गावांतील आरक्षित जागांवर अतिक्रमण वाढली आहेत. अशा जागा मोकळ्या करण्यासाठी मोठ-मोठी दुकाने, घरे हटविताना प्रशासनाला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. पालिका प्रशासनाने आरक्षित केलेल्या जागा वेळीच तत्काळ ताब्यात घेऊन अशा लोकोपयोगी जागांचे संरक्षण करणे गरजेचे आहे.अन्यथा लोकोपयोगी उपक्रम राबविताना पालिकेला जागेची अडचण निर्माण होऊ शकते.