ICC Women’s T20 World Cup 2024 : युएईची परिस्थिती घराच्या मैदनासारखीच – मिताली राज

ICC Women’s T20 World Cup 2024 :- येत्या 3 ऑक्टोबरपासून संयुक्त अरब अमिरातीमध्ये महिला टी-20 विश्वकरंडक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. येथील मैदानांवर घरच्या मैदानासारखीच परिस्थिती असल्याने, या स्पर्धेत भारताला इतर संघापेक्षा अधिक फायदा होण्याची शक्यता असल्याचे भारताची माजी क्रिकेटपटू मिताली राजने बोलताना सांगितले.
काही दिवसांपूर्वी बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणात उलटफेर झाला होता. त्यामुळे तेथील राजकीय अशांततेच्या कारणाने बांगलादेशमध्ये होणारा महिला टी-20 विश्वकरंडक संयुक्त अरब अमिरातीमध्ये घेण्याचा निर्णय आयसीसीने घेतला होता. या स्पर्धेसाठी शारजाह आणि दुबई या दोन ठिकाणी स्पर्धा घेणार असल्याचे स्पष्ट केले होते.
या संदर्भात ‘स्टार स्पोर्ट्स’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलताना मिताली राज म्हणाली, ही विश्वकरंडक स्पर्धा आहे. भारतीय संघाने यापूर्वी देखील अनेकदा येथील मैदानावर क्रिकेट खेळले आहे. त्यामुळे येथील मैदानांची स्थिती देखील अगदी भारतीय मैदानांसारखीच आहे. त्यामुळे येथे लढती खेळण्याचा भारतीय संघाला फायदा होऊ शकतो, असे मिताली म्हणाली. याचबरोबरीने, या स्पर्धेत प्रत्येक संघ तयारीनिशी उतरणार आहे. त्यामुळे भारतीय संघाने आत्मसंतुष्टता टाळावी, असा सल्ला देखील मितालीने बोलताना दिला.
भारताची पहिली लढत ही न्यूझीलंड संघासोबत 4 ऑक्टोबर रोजी होणार आहे. भारतीय संघाचा समावेश अ गटात करण्यात आला असून या गटामध्ये सहा वेळेस विश्वकरंडक जिंकणारा ऑस्ट्रेलिया, नुकताच आशिया करंडक जिंकणारा श्रीलंका, पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान आणि न्यूझीलंड हे संघ असणार आहेत.
पहिले विजेतेपद जिंकावे…
प्रत्येकाला आपल्या संघाने विजेतेपद मिळवावे, हीच भावना असते. मात्र, भारतीय संघ अंतिम फेरीत दाखल होऊन देखील विजेतेपदाने हुलकावणी दिली होती. त्यामुळे अजूनही भारतीय महिला संघाला विश्वकरंडक स्पर्धेचे विजेतेपद मिळविता आले नाही. त्यामुळे भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी करताना विजेतेपद मिळवावे, असे मितालीने बोलताना सांगितले.





