IND vs ENG : लीड्स कसोटीत इंग्लंडची मोठी चूक! बेन स्टोक्ससह संघावर आयसीसी करणार कारवाई?

IND vs ENG ICC to take action against England : इंग्लंड क्रिकेट संघ भारताविरुद्ध पहिला कसोटी सामना जिंकेल की हरेल, हे नंतर ठरेल, परंतु त्याआधीच इंग्लंडसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे, जी पुढे जाऊन त्यांच्यासाठी मोठी अडचण ठरू शकते. इंग्लंड संघाने लीड्स कसोटी जिंकली तरी त्यांचे नुकसान होईल, आणि जर हरले तर मग बोलायलाच नको. लवकरच आयसीसी इंग्लंड क्रिकेट संघावर मोठी कारवाई करू शकते. त्याचे कारण काय आहे? जाणून घेऊया.
इंग्लंडने काय केली चूक?
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका जागतिक कसोटी चॅम्पियनशिप अंतर्गत खेळली जात आहे. याचा अर्थ संपूर्ण स्पर्धेवर आयसीसीची करडी नजर आहे. शिवाय, सामन्यादरम्यान कोणता संघ वेळ वाया घालवतो, तर त्यांच्यावर कारवाई केली जाते. आता इंग्लंडचा संघ याच कक्षेत आला आहे. लीड्स येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी वेळ वाया घालवल्याबद्दल पंचांनी इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याला इशारा दिला. विशेष म्हणजे, ही दुसरी वॉर्निंग आहे, जी संघासाठी घातक ठरू शकते.
मागील डब्ल्यूटीसी स्पर्धेच्या चक्रातही इंग्लंडची कहाणी अशीच होती. इंग्लंडचा संघ क्षेत्ररक्षण करताना वेळ वाया घालवण्यासाठी चांगलाच कुप्रसिद्ध आहे. मागील विश्व कसोटी अजिंक्यपद चक्रात, इंग्लंडच्या संघाला वेळ वाया घालवल्यामुळे तब्बल २२ गुणांचा दंड ठोठावण्यात आला होता, जो आयसीसीने लादला होता. डब्ल्यूटीस स्पर्धेत एक सामना जिंकल्यावर १२ गुण मिळतात, म्हणजेच मागील हंगामात इंग्लंडने जवळपास दोन सामने जिंकण्याइतके गुण आपल्या निष्काळजीपणामुळे गमावले. आता नवीन चक्र सुरू झाले असताना पुन्हा तीच कहाणी समोर येताना दिसत आहे.
हेही वाचा – IND vs ENG : पंतचा पराक्रम आणि विवाद: लीड्स कसोटीत शतकांनंतर आयसीसीने फटकारले!
सामना संपल्यानंतर आयसीसीकडून निर्णय घेतला जाऊ शकतो –
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात कोणता संघ पुढे राहील आणि कोणता मागे, याचा निर्णय पीसीटी म्हणजेच विजयाच्या टक्केवारीवर आधारित होतो, परंतु गुणांचाही यात महत्त्वाचा वाटा असतो. इंग्लंडला दोनदा वॉर्निंग देण्यात आली आहे, म्हणजेच त्यांच्यावर काही ना काही दंड आकारला जाणे जवळपास निश्चित आहे. सामन्यानंतर आयसीसी याबाबत निर्णय घेईल. म्हणजेच इंग्लंडचे नुकसान निश्चित आहे, फक्त किती होईल हे पाहणे महत्त्वाचे आहे.





