HSRP Deadline : एचएसआरपीसाठी पुन्हा मुदतवाढ! पण या तारखेनंतर कारवाईला तयार रहा, दंड चुकणार नाही

प्रभात वृत्तसेवा
पुणे – राज्य परिवहन विभागाने वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट (एचएसआरपी) बसविण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली. आत्तापर्यंत चार वेळा मुदतवाढ देऊनही शहरात केवळ ४० टक्केच वाहनांनी प्लेट बसविण्यासाठी नोंदणी केली. नंबरप्लेट बसवण्याचा वेग लक्षात घेता, पुढील दीड महिन्यात किती पुणेकर प्लेट बसवून घेतील हा प्रश्नच आहे. तसेच सर्व वाहनांना एचएसआरपीसाठी आणखी कितीवेळा मुदतवाढ द्यावी लागेल, हाही प्रश्न आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २०१९ पूर्वीच्या वाहनांना एचएसआरपी बसविणे बंधनकारक आहे. पुण्यात जवळपास २६ लाख वाहनांना ही प्लेट बसवावी लागणार आहे. त्यासाठी एका कंपनीला काम दिले असून त्याचे काम सुरू आहे. वाहनसंख्या आणि एचएसआरपी नोंदणीसाठीचा कालावधी याचे गणित काही जमत नाही. डिसेंबर २०२४ पासून ही प्रक्रिया सुरू झाली असून चारवेळा मुदतवाढ दिली आहे. आता पाचव्यांदा ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली आहे.
मागील दहा महिन्यांत केवळ ९ लाख वाहनांनी प्लेट बसविण्यासाठी नोंदणी केली. राहिलेले १७ लाख वाहनांना प्लेट बसविण्यासाठी आणखी किती मुदतवाढ द्यावे लागेल, असा प्रश्न उपस्थित होतो.दिलेली मुदत संपल्यावर १ डिसेंबरनंतर एचएसआरपी नसणाऱ्या वाहनांवर वायुवेग पथक कारवाई करेल असे राज्य परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी सांगितले. त्यामुळे तात्काळ एचएसआरपी बसवली नाही तर कारवाई सुरू झाल्यावर नंबरप्लेटपेक्षा अधिक दंड भरावा लागेल. अपाॅइमेंट मिळाल्यानंतरही प्लेट बसविली नाही त्यांनी तात्काळ ती बसवून घ्यावी. इतरांनी तात्काळ नोंदणी करावी, असे आवाहन आरटीओने केले आहे.
दृष्टीक्षेपात एचएसआरपी..
-वाहनसंख्या – २६ लाख
-नोंदणी झाली – ९ लाख ८ हजार ६४६
-वेळ मिळाली – ८ लाख ९० हजार १८५
-नंबरप्लेट बसवली – ७ लाख २ हजार ३७३




