Mumbai Rain news : हेडफोनने केला घात, भांडूपमध्ये वीजेचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू, लोकांनी हाका मारल्या पण…

Mumbai Rain news : भांडूपमधील पन्नालाल कंपाऊंड परिसरात खुल्या हाय टेन्शन वीजतारेचा धक्का बसून 17 वर्षीय दीपक पिल्ले या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना मंगळवारी (19 ऑगस्ट) घडली आहे.
मुसळधार पावसात दीपक एल.बी.एस. मार्गावरून घरी जात होता. कानात हेडफोन घातल्यामुळे स्थानिकांनी दिलेल्या सावधानतेच्या हाकांचा आवाज त्याला ऐकू आला नाही. तो खुल्या वीजतारेच्या संपर्कात येताच त्याला जोरदार विजेचा झटका बसला. या घटनेने परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण पसरले असून, महावितरणच्या निष्काळजीपणावर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
नेमकं काय घडलं?
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दीपक पिल्ले हा भांडूपच्या पन्नालाल कंपाऊंड परिसरातून एल.बी.एस. मार्गावरून पायी घरी निघाला होता. त्यावेळी मुसळधार पाऊस सुरू होता, आणि रस्त्यावर महावितरणची हाय टेन्शन वीजतार खुली पडलेली होती. या तारेतून विजेचा प्रवाह रस्त्यावर पसरला होता.
स्थानिक नागरिकांनी याबाबत इतरांना सावध करण्याचा प्रयत्न केला. प्रत्यक्षदर्शी दिनेश जैन यांनी सांगितले, “आम्ही अनेकांना सावध केले, पण दीपकने कानात हेडफोन घातले होते. आम्ही त्याला हाका मारल्या, धावत जाऊन सावध करण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत तो वीजतारेच्या संपर्कात आला आणि खाली कोसळला.”
या दुर्घटनेने भांडूप परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. स्थानिकांनी महावितरणच्या निष्काळजीपणावर तीव्र टीका केली असून, रस्त्यावरील खुल्या वीजतारा तातडीने दुरुस्त करण्याची मागणी केली आहे. “जर वेळीच उपाययोजना केल्या असत्या, तर हा जीव वाचला असता,” अशी खंत स्थानिकांनी व्यक्त केली. अशा घटना टाळण्यासाठी रस्त्यावरील वीजतारांचे योग्य व्यवस्थापन, नियमित देखभाल आणि सतर्कता यावर प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे.
हेडफोन ठरला घातक
दीपकच्या मृत्यूचे प्रमुख कारण ठरले ते त्याच्या कानातील हेडफोन. पावसात रस्त्यावरून चालताना त्याने हेडफोन घातले होते, ज्यामुळे त्याला परिसरातील नागरिकांचे सावधानतेचे आवाज ऐकू आले नाहीत. खुल्या हाय टेन्शन वीजतारेच्या संपर्कात येताच त्याला जोरदार विजेचा झटका बसला, आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.




