प्रभात वृत्तसेवा पुणे – महेश सोसायटीकडून अप्परला जाणाऱ्या मार्गावर झाडांच्या फांद्या छाटताना उच्च दाब वाहिनीला धक्का लागून १७ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला. ही घटना सोमवारी दुपारी दोनच्या दरम्यान घडली, जखमी मुलाला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.उच्च दाब वाहिनीला झाडाच्या फांद्या लागत असल्याने त्या छाटण्यासाठी एका हॉटेल व्यावसायिकाने खासगीरीत्या झाडे कापण्यासाठी एका मुलाला बोलावले होते. ते काम करताना मुलाच्या हातातील कोयता थेट उच्च दाब वाहिनीला चिकटल्याने त्याला विजेचा तीव्र झटका बसला. या घटनेत तो सुमारे पंधरा वीस फुटांवरून खाली कोसळला. नागरिकांनी तत्काळ त्याला रुग्णालयात हलवले.घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. पोलीस आणि वीज वितरण कंपनीचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. या घटनेनंतर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यांचे म्हणणे आहे, की शासकीय परवानगी न घेता अशा प्रकारे झाडे कापणे म्हणजे निष्काळजीपणा आहे. अधिकारी काय करत होते, असा प्रश्नही नागरिकांनी उपस्थित केला आहे.