Panshet Dam Canal Death: पानशेत धरणाच्या कॅनॉलमध्ये बुडून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू
Panshet Dam Canal Death :

Panshet Dam Canal Death: मित्रांसोबत पर्यटनासाठी आलेल्या २२ वर्षीय तरुणाचा पानशेत धरणाच्या कॅनॉलमध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. अंकुश मनोज चौधरी (वय २२, रा. ईशापल सोसायटी, लेन नं. १, मलिक नगर, कोंढवा खुर्द, पुणे) असे मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोंढवा खुर्द परिसरातील सत्यम संतोष झा, अभिषेक पांडे, आदर्श पांडे, गौरव प्रजापती, देव भारती आणि अंकुश चौधरी हे मित्र सोमवारी दुपारी पानशेत परिसरात पर्यटनासाठी आले होते. दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास ते पानशेत धरणाच्या कॅनॉलजवळ गेले.
पोहता येत नसल्याने मृत्यू –
यावेळी आदर्श, देव आणि अंकुश हे तिघे जण कॅनॉलमध्ये पोहण्यासाठी उतरले. मात्र, अंकुशला पोहता येत नसल्याने तसेच पाण्याची खोली आणि खड्ड्याचा अंदाज न आल्याने तो अचानक पाण्यात बुडू लागला. त्याचे मित्र देव आणि आदर्श यांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला; मात्र कॅनॉलमधील पाण्याचा प्रवाह वेगवान असल्याने अंकुश खोल पाण्यात वाहून गेला.
वेल्हे पोलीस ठाण्यात नोंद –
घटनेची माहिती मिळताच पानशेत पोलीस दूरक्षेत्रातील कर्मचारी, धरणावरील सुरक्षा रक्षक तसेच आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले. पथकाने तत्काळ शोधमोहीम राबवून अंकुशचा मृतदेह पाण्याबाहेर काढला.
या प्रकरणी वेल्हे पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलीस हवालदार पंकज मोघे पुढील तपास करत आहेत.





