Kalyan news : कल्याण रेल्वे स्थानकावर दुपारी एकच्या सुमारास ओव्हरहेड वायरच्या खांबावर चढलेल्या एका तरुणामुळे तब्बल दोन तास मध्य रेल्वे विस्कळीत झाली. प्रशासनाने वीजपुरवठा खंडित करण्याचा प्रयत्न केला. मात्र तरुणाला विजेचा धक्का बसून तो खाली कोसळला. मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि २ च्या दरम्यान असलेल्या एका ओव्हरहेड वायरच्या खांबावर एक अज्ञात तरुण चढला. रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे प्रशासनाने तात्काळ त्या मार्गावरील वीजपुरवठा खंडित केला. पोलिसांनी त्या तरुणाला खाली उतरवण्यासाठी समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरुण भेदरलेल्या अवस्थेत होता. तो तरुण कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. ऐन गर्दीच्या वेळी वीजपुरवठा बंद करावा लागल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. सुमारे दोन तासाच्या या थरारात या संबंधित तरुणाने खांबांच्या सहाय्याने प्लॅटफॉर्मच्या शेडवर जात पळून जायचा प्रयत्न केला. यावेळी तरुणाला विजेचा धक्का बसला आणि तो खाली पडला. यात तो गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.