त्यांनी स्वतः मला ‘यमला पगला दीवाना’साठी विचारलं, पण मी धरमजींना नकार दिला…; सचिन पिळगावकरांचा मोठा खुलासा

Sachin Pilgaonkar | Dharmendra : हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘ही-मॅन’ आणि दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचे सोमवारी (दि. 24 ) निधन झाले आहे. 89 वर्षांच्या या व्यक्तीने मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते आणि रुग्णालयातही दाखल होते त्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले होते.
तेव्हापासून ते त्यांच्या कुटुंबासोबत त्यांच्या घरी वेळ घालवत होते. मात्र, सोमवारी (दि. 24 ) सकाळी त्यांचे निधन झाले. भारतीय चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ गाजवणारा लखलखता तारा निखळल्याची शोकभावना सर्वच स्तरातून व्यक्त होत आहे.
त्यांच्या निधनानंतर संपूर्ण सिनेसृष्टी शोकसागरात बुडाली आहे. विले पार्ले येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले. अमिताभ बच्चन, शबाना आजमी, संजय दत्त, सलमान खान, रणवीर सिंह–दीपिका पादुकोण असे अनेक सेलिब्रिटी स्मशानभूमीत अंत्यदर्शनासाठी आले होते.
दरम्यान, त्यांच्या निधनानंतर मराठीतील ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देत एक अत्यंत हृदयस्पर्शी किस्सा सांगितला, ज्यातून धर्मेंद्र यांचा अत्यंत नम्र आणि साधा स्वभाव समोर आला आहे.
सचिन पिळगांवकर यांनी दिलेल्या एका मुलाखतीत धर्मेंद्र यांच्यासोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा देताना सांगितले की, ‘मी 90 च्या दशकाच्या उत्तरार्धातील एक किस्सा सांगू इच्छितो. मी ‘यमला पगला दीवाना‘ हे चित्रपटाचे शीर्षक ‘इंडियन मोशन पिक्चर प्रोड्यूसर्स असोसिएशन’कडे नोंदवले होते.
एके दिवशी एका निर्मात्याने मला फोन करून शीर्षक त्यांना देण्याविषयी विचारले, पण मी नकार दिला. काही दिवसांनी, मला स्वतः धरमजींचा फोन आला. मी त्यांना विचारले, ‘कसे आहात धरमजी?’ ते खूपच सौम्यतेने आणि उबदारपणे बोलले.
मग ते म्हणाले, ‘सचिन, मला तुम्हाला काहीतरी विचारायचे होते… तुमच्याकडे ‘यमला पगला दीवाना’ हे चित्रपटाचे शीर्षक आहे.’ मी म्हटले की, ‘नाही, ते आता माझ्याकडे ते नाही.’ धरमजींनी स्मितहास्य केलं आणि म्हणाले, ‘पण निर्मात्याने मला सांगितले की, तुम्ही त्यांना नकार दिला.’
मी त्यांना म्हणालो की, ‘ते शीर्षक फक्त तोपर्यंत माझे होते, जोपर्यंत तुम्ही ते मागितले नव्हते. आता ते माझे राहिले नाही, ते तुमचे आहे.’मी त्यांना आणखी काही हवे आहे का, असं विचारलं. कारण ज्या माणसाने भारतीय चित्रपटसृष्टीला इतके काही दिले आहे, त्यांची परतफेड आपण कशी करणार? त्यांचा वारसा नेहमीच सर्वोच्च राहील.’ असं ते यावेळी म्हणाले.
धमेंद्र आणि सचिन पिळगावकर यांची जोडी :
धर्मेंद्र यांच्या ‘शोले’ सिनेमात सचिन पिळगावकर होते. याआधी 1967 साली त्यांनी धर्मेंद्र यांच्या ‘मझली दीदी’ या सिनेमात बालकलाकार म्हणून काम केले होते. धर्मेंद्र यांचा ‘इक्कीस’ हा शेवटचा पुढील महिन्यात सिनेमा महिनाभरात रिलीज होणार आहे. यामध्ये अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा मुख्य भूमिकेत आहे.
View this post on Instagram
सर्वात देखणे धरम जी !
सचिन पिळगावकर यांनी धर्मेंद्र यांच्यासोबतचा जुना फोटो शेअर करत लिहिले, “सर्वात देखणे धरम जी, दिग्गज व्यक्ती आपल्याला सोडून गेली आहे पण त्यांचा वारसा कायम राहील. त्यांच्याबरोबर काम करण्याची मला संधी मिळाली यासाठी मी कायमच कृतज्ञ राहीन. खरा ही-मॅन कायम सर्वांच्या स्मरणात राहील. ॐ शांति” असं त्यांनी म्हंटलं आहे.





