Harshvardhan Sapkal : “हा शेवट नाही, नव्या लढ्याची सुरुवात;” अर्ज मागे घेताच हर्षवर्धन सपकाळ असं का बोलले?
Harshvardhan Sapkal : बारामतीतून काँग्रेसने अर्ज माघारी घेतला असला, तरी हा शेवट नसून लढ्याची सुरुवात आहे, असा संदेश हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला.
Harshvardhan Sapkal – बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतून काँग्रेसने उमेदवारी अर्ज माघारी घेतला असला, तरी हा शेवट नसून नव्या लढ्याची सुरुवात आहे, असा ठाम संदेश हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला. दरम्यान, अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची काँग्रेसची भूमिका कायम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्राच्या राजकीय परंपरा, संस्कृती, सभ्यता जपत (स्व) अजित पवार यांना आदरांजली देण्याच्या भावनेतून उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शुक्रवार (दि.१०) बारामती काँग्रेस कार्यालयात विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार घेतलेले काँग्रेस पक्षाचे उमेदवार ॲड. आकाश मोरे, उमेदवारीसाठी इच्छुकांची, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भेट घेतली.
सपकाळ म्हणाले, अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेची चौकशी व्हावी, यासाठी गुन्हा दाखल करण्याची काँग्रेसची भूमिका कायम आहे. याप्रकरणी कर्नाटक सरकारने गुन्हा नोंदवून पाठपुरावा सुरू केले. या संदर्भात रोहित पवार यांनी कर्नाटकच्या गृहमंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती त्यांनी दिली. बारामतीत काँग्रेस उमेदवार मिळणार नाही, असा विरोधकांचा उपहास असताना सहा इच्छुकांनी उमेदवारीसाठी पुढाकार घेतला,
याकडे लक्ष वेधत सपकाळ म्हणाले की, प्रतिकूल परिस्थितीतही काँग्रेसचा विचार जिवंत असल्याचे कार्यकर्त्यांनी सिद्ध केले आहे. यावेळी पुणे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष श्रीरंग चव्हाण, जिल्हा कार्याध्यक्ष लहू निवंगने, बारामती शहराध्यक्ष अशोक इंगुले, सरचिटणीस राहुल वाबळे, कमलाकर सातव, गोविंद मिरगे, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव वीरधवल गाडे, पुणे जिल्ह्यातील कॉंग्रेसचे प्रमुख पदाधिकारी, तालुकाध्यक्ष, कार्यकर्ते उपस्थित होते.
कॉंग्रेस कार्यकर्ता संविधानासाठी लढणार
बारामतीतील काँग्रेस कार्यालयात आयोजित बैठकीत सपकाळ म्हणाले, सीमेवर जवान जसा देशासाठी लढतो, त्याचप्रमाणे काँग्रेसचा कार्यकर्ता संविधान, लोकशाहीच्या रक्षणासाठी लढत राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. काँग्रेसचा विचार घराघरात पोहोचवण्याचा निर्धार कायम असल्याचे सांगितले.





