Pune Water Cut: पुणेकरांना मोठा दिलासा! शहरातील पाणीकपात रद्द होणार? सोमवारी होणार अंतिम निर्णय
Pune Water Cut: पालखी सोहळ्यानिमित्त १२ जुलैपर्यंत पाणीकपात तात्पुरती स्थगित; १३ जुलैच्या बैठकीत नियमित पाणीपुरवठ्यावर शिक्कामोर्तब होण्याची चिन्हे.

Pune Water Cut – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा ६० टक्क्यांवर पोहोचल्याने महापालिकेकडून शहरात सुरू असलेली दिवसाआड पाणीकपात मागे घेतली जाण्याची शक्यता आहे. याबाबतचा निर्णय पुढील आठवड्यात सोमवारी होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील शिल्लक पाणीसाठा ३.९० टीएमसीपर्यंत खाली आल्यानंतर हे पाणी ऑगस्टअखेरपर्यंत पुरेल, या दृष्टीने नियोजन करण्याचा निर्णय घेऊन महापालिकेने १५ जूनपासून शहरात दिवसाआड पाणीकपात सुरू केली होती.
त्यानंतर जूनअखेरपर्यंत धरणांच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस न झाल्याने धरणांतील पाणीसाठा ३.५६ टीएमसीपर्यंत खाली आला होता. मात्र, त्यानंतर अवघ्या आठ दिवसांत धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणसाठा तब्बल १७ टीएमसीपर्यंत वाढला आहे, तसेच जुलैअखेर आणि ऑगस्ट महिन्यातही चांगल्या पावसाचा अंदाज असल्याने यंदाही धरणे पूर्ण भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरात सुरू असलेली पाणीकपात मागे घेतली जाण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.
नागरिकांचे निर्णयाकडे लक्ष
महापालिका प्रशासनाकडून पालखी सोहळ्याच्या निमित्ताने ७ ते १२ जुलै या कालावधीसाठी पाणीकपात तात्पुरती मागे घेण्यात आली आहे. त्यानंतर धरणांतील उपलब्ध पाणीसाठ्याची स्थिती पाहून पाणीकपात कायम ठेवायची की पूर्णपणे मागे घ्यायची, याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. त्यासाठीची बैठक सोमवारी (दि. १३) होण्याची शक्यता आहे. सध्या धरणांतील पाणीसाठा मागील वर्षीच्या साठ्याच्या जवळपास पोहोचला आहे, तसेच पुढील काळातील पाऊस लक्षात घेऊन धरणांमध्ये पाणीसाठवण क्षमतेसाठी जागा उपलब्ध ठेवणेही आवश्यक आहे. ही बाब विचारात घेऊन या बैठकीत पाणीकपातीबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान, धरणांतील पुरेशा पाणीसाठ्यामुळे पाणीकपात पूर्ण मागे घेण्याची मागणीही नागरिकांकडून होत आहे.





