आता घड्याळाची वेळ चांगली नाही – शिवेंद्रराजे भोसले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. रहिमतपूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ सभेत मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या घड्याळावर जोरदार टीका केलीय. आपलं चिन्ह कमळ आहे आता घड्याळाची वेळ चांगली नाही, आता इकडे तिकडे बघू नका. हातातलं घड्याळ वेगळं आहे आणि चिन्हाचं घड्याळ वेगळं आहे. असं म्हणत त्यांनी अजित पवारांवर निशाणा साधलाय. एवढंच नाही तर त्यांनी, सर्वांनी विचार करा आणि भाजपचे उमेदवारच निवडून द्या असं आवाहन केलं. शिवेंद्रराजे भोसले यांनी रहिमतपूर येथील सभेत राष्ट्रवादीवर टीका केली. ================= बारामतीत या दोन जागांसाठीची निवडणूक पुढे बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन जागांसाठीची निवडणूक पुढे ढकलण्यात आलीय. प्रभाग क्रमांक 13 ब आणि प्रभाग क्रमांक 17 अ या दोन जागा वगळून इतर सर्व ठिकाणी आणि नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक 2 डिसेंबर रोजी होणार आहे. भाजपच्या दोन उमेदवारांचे अर्ज नामंजूर करण्यात आल्याने ते न्यायालयात गेले होते. आता न्यायालयाच्या निर्देशानुसार, या दोन जागांवरील निवडणूक प्रक्रिया पुन्हा नव्याने पार पडणार आहे. बारामती नगर परिषदेच्या निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. संगीता राजापूरकर यांनी यासंदर्भात एक आदेश जारी केला आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या नव्याने येणाऱ्या आदेशानुसार वरील दोन जागांची निवडणूक होईल. तोपर्यंत या दोन जागा वगळून नगराध्यक्ष आणि इतर बाकीच्या सर्व जागांचा निवडणूक कार्यक्रम नियोजित वेळापत्रकानुसार होणार आहे. ================== …तर पुढेही युती टिकवायची आहे का? शिवसेना आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यात दोस्तीत कुस्ती सुरु असल्याचं चित्र आहे. अशातच आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचं एक वक्तव्य समोर आलं आहे ज्यात त्यांनी २ तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे असं म्हटलं आहे. ज्यावर खासदार श्रीकांत शिंदेंनीही उत्तर दिलं आहे. “मित्र पक्षांनी एकमेकांबाबत बोलताना तारतम्य बाळगलं पाहिजे. सगळ्यांनी एकमेकांबाबतची आचारसंहिता पाळली पाहिजे. केंद्रातही युती आहे आणि राज्यातही युती आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनीही म्हटलं आहे की प्रचार करत असतो तेव्हा खालच्या पातळीवर प्रचार करु नये. मला माहीत नाही की रविंद्र चव्हाण काय म्हणाले. पण ते असं बोलले असतील तर पुढेही युती टिकवायची आहे का? ” असं उत्तर श्रीकांत शिंदे यांनी दिलं आहे. ===================== गौरी पालवे गर्जे आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या डॉक्टर पत्नी गौरी पालवे गर्जे आत्महत्या प्रकरणात आता एकनवीन माहिती समोर आलीय. या प्रकरणातील प्राथमिक माहितीनुसार, अनंत गर्जेच अफेअर आणि सातत्याने होणाऱ्या वादाला कंटाळून गौरी पालवे गरजेंनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली होती. मात्र आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. त्यामुळे घातपाताचा संशय व्यक्त केला जातोय. मयत गौरी गर्जे आणि अनंत गर्जे दोघांच्याही शरीरावर जखमा आढळल्या आहेत. यामुळे गौरीचा मृत्यू होण्याआधी अनंत आणि गौरीमध्ये झटापट झाली होती का? असा संशय व्यक्त केला जातोय. ================= महाराष्ट्र पुन्हा गारठणार! राज्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर शीत वारे वाहू लागले आहे. गेले तीन ते चार दिवस खराब असलेल्या वातावरणाने नागरिकांना हैराण केले. अशातच सेन्यार चक्रीवादळ तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशच्या किनाऱ्याला धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. तर दुसरीकडे बंगालच्या उपसागरात डिटवाह चक्रीवादळ तयार झालंय . या दोन चक्रीवादळामुळे राज्यातील तापमान सतत बदलत असल्याच हवामान विभागानं म्हटलंय. मात्र पुढच्या काही दिवसात राज्याला पुन्हा एकदा हुडहुडी भरणार असल्याचंही हवामान विभागानं म्हटलं, आज कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अंशत: ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. ========================= राज्यात येत्या ५ तारखेला सर्व शाळा बंद? शालेय विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. राज्यात येत्या ५ तारखेला सर्व शाळा बंद राहण्याची शक्यता आहे. मुख्याध्यापक महामंडळाने राज्यव्यापी संपाचा इशारा दिलाय. परिणामी राज्यातील शाळा बंद राहतील. पुण्यातील बैठकीत मुख्याध्यापक महामंडळाने हा निर्णय घेतलाय. येत्या ५ डिसेंबर रोजी राज्यातील शाळा बंद ठेवून सर्व जण जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून मागणी केली जातीय.या मागण्या पूर्ण होत नसल्याचे संपाचा इशारा देण्यात आलाय. ========================= कर्नाटकचे मुख्यमंत्रीपद खरगेंकडे ? कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी पुरेसे आमदार जमवले तर भाजप त्यांना कर्नाटकचे ‘एकनाथ शिंदे’ करू शकतात. तसं झालं तर हातातून मोठं राज्य निसटेल, अशी भीती काँग्रेस ‘हायकमांड’ला वाटू लागलीय. त्यामुळेच काँग्रेसमधील फूट आणि राज्यातील सरकार वाचवण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपवले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येतीय. कर्नाटकातील मुख्यमंत्रीपदाचा वाद विकोपाला गेला असून, राहुल गांधींनी सिद्धरामय्या व डी. के. शिवकुमार यांना चर्चेसाठी दिल्लीला बोलावले आहे. या बैठकीमध्ये तोडगा निघाला नाही, तर खरगेंच्या नावाचा गांभीर्याने विचार केला जाऊ शकतो. कर्नाटकमधील संघर्षावर हायकमांड निर्णय घेईल, असे सांगून खरगेंनी ते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याचेही सूचित केलंय. ==================== इम्रान खान यांच्याविरोधात षडयंत्र रचलं जातय पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पीटीआयचे संस्थापक इम्रान खान यांना पाकिस्तानातील रावळपिंडीच्या अदियाला तुरुंगात ठेवण्यात आलंय. दरम्यान इम्रान खान यांची हत्या करण्यात आल्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरल्या होत्या. तसंच त्यांच्या कुटुंबीयांना मागील तीन आठवड्यांपासून भेटू दिलेलं नाही. आता अदियाला तुरुंगाबाहेर इम्रान खानच्या बहिणींनी आंदोलन करत इम्रान खान कुठे आहेत? शाहबाज सरकारने उत्तर द्यावं असं म्हणत ठिय्या दिलाय. दरम्यान इम्रान खान यांच्याविरोधात षडयंत्र रचलं जात असल्याचा आरोप देखील त्यांच्या बहिणींनी केलाय. ऑगस्ट-सप्टेंबरच्या भेटीनंतर आमची आणि इम्रान खान यांची भेट झालेली नाही. असंही त्यांनी म्हटलंय. ====================== दीप्ती शर्मा ठरली सर्वात महागडी खेळाडू महिला प्रीमियर लीग 2026 च्या लिलावात एकूण 67 खेळाडूंवर बोली लावण्यात आली. ज्यात 23 परदेशी खेळाडूंचा समावेश होता. तर यामध्ये दीप्ती शर्मा ही सर्वात महागडी खेळाडू ठरली. दीप्ती शर्माला यूपी वॉरियर्सने आरटीएम (ट्रेड मार्क्सचा अधिकार) वापरून 3.2 कोटी रुपयांना खरेदी केली. मुंबई इंडियन्समध्ये परतलेली अमेलिया केर ही सर्वात महागडी परदेशी खेळाडू होती. लिलावात 67 खेळाडूंवर एकूण 40.8 कोटी रुपये खर्च झाले. यूपी वॉरियर्सकडे सर्वाधिक पैसे असल्याने त्यांनी सर्वात महागडे खेळाडू खरेदी केले. महिला प्रीमियर लीगच्या लिलावात एकूण 11 खेळाडू करोडपती झाल्यात. यूपी वॉरियर्सने पाच खेळाडूंना 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीत खरेदी केले. दिल्ली कॅपिटल्सने तीन खेळाडूंना 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीत खरेदी केले. ================== येत्या काही महिन्यात ऐश्वर्या मला लग्नाची मागणी घालेल बॉलिवूडची सुपरस्टार अभिनेत्री ऐश्वर्या रायचे फक्त देशातच नाहीतर जगभरात तिचे चाहते आहेत. पाकिस्तानातही ऐश्वर्या रायचे चाहते आहेत. अलिकडेच पाकिस्तानात ऐश्वर्या रायचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला, ज्यामुळे मोठा वाद निर्माण झालेला. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या राय बच्चनबाबत एक विचित्र आणि आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात आलीय. व्हायरल व्हिडीओमध्ये, पाकिस्तानातला एक मौलाना दावा करतोय की, ऐश्वर्या राय पुढच्या दोन ते चार महिन्यांत त्याला लग्नाचा प्रस्ताव पाठवू शकते. या, व्हिडीओत तो पुढे असंही म्हणतोय की, तो सर्वात आधी ऐश्वर्याला इस्लाम धर्म स्विकारायला सांगणार आणि त्यानंतर तिच्याशी लग्न करणार. एवढं नाही तर त्यानं आधीच तिच्यासाठी एक मुस्लिम नाव निवडलंय, ज्यामुळे तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.