नेवासाफाटा – पिंपरी चिंचवड येथील पिंपळे सौदागर येथे राहणाऱ्या विराज जगताप या युवकाची हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांना कडक शासन करण्यात यावे. यातील आरोपींना त्वरित अटक करण्यात यावी व फाशी सारखी कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी अहमदनगर जिल्हा कॉंग्रेस (एस.सी.) विभाग कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन नेवासा पोलीस स्टेशनला देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड येथील पिंपळे सौदागर येथे राहणाऱ्या विराज जगताप या बौद्ध तरुणाची जातीयवादी मानसिकतेतून निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना फुले, शाहू, आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला काळिमा फासणारी आहे.
या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करून हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी ऍड. उज्वल निकम यांनी नियुक्ती करण्यात यावी. तसेच यातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अन्यथा कॉंग्रेस अनुसूचित जाती विभाग कमिटीच्या वतीने महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. सदरचे निवेदन ठाणे अंमलदार मोढवे यांनी स्वीकारले. यावेळी अहमदनगर जिल्हा कॉंग्रेसच्या अनुसूचित जाती विभाग कमिटीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र रत्नाकर वाघमारे, जिल्हा कार्याध्यक्ष कमलेश गायकवाड, नेवासा तालुका अध्यक्ष नंदकुमार कांबळे, बबलू साळवे,संकेत वाघमारे, नितीन कांबळे, अविनाश कांबळे, वैभव वाघमारे, प्रकाश कांबळे उपस्थित होते.