GT vs MI : लाईव्ह सामन्यात आशिष नेहराचा का चढला पारा? गुजरातच्या फलंदाजांवर संतापल्याचा VIDEO व्हायरल

GT vs MI Ashish Nehra angry Gujarat Titans batters video viral : आयपीएल २०२५ चा ९वा सामना २९ मार्च रोजी अहमदाबादमधील नरेंद्र स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स आमनेसामने आले होते. या सामन्यात गुजरातने आपले विजयाचे खाते उघडत मुंबईचा ३६ धावांनी पराभव केला. या सामन्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये गुजरात संघाचा कोच आशिष नेहरा लाईव्ह सामन्यात आपल्या फलंदाजांना संतापताना दिसला.
आशिष नेहरा अचानक का संतापला –
या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर गुजरातचे सलामीवीर शुबमन गिल आणि साई सुदर्शन यांनी पहिल्या विकेट्ससाठी ७६ धावांची भागीदारी केली. मात्र, यानंतर जोस बटलरनेही २४ चेंडूत ३९ धावांची खेळी केली. तथापि, १९ व्या षटकात, जीटीने सलग दोन विकेट्स गमावल्या. त्यामुळे आशिष नेहरा रागाने लाल झाला आणि लाईव्ह सामन्यात आपल्या फलंदाजावर ओरडू लागला. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नक्की झालं काय?
How I cry when things don't go according to me in my life:
😭Unreal reaction Ashish Nehra ji!#GTvsMI #GTvMI #MIvsGT #IPL2025 #AshishNehra pic.twitter.com/Bxig8utYut— Prachi Khandelwal (@PrachiK2107) March 29, 2025
गुजरात टायटन्सच्या डावातील १८ व्या षटकात ट्रेंट बोल्टच्या शेवटच्या चेंडूवर साई सुदर्शन झेलबाद झाला. त्यानंतर १९ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर नवीन फलंदाज राहुल तेवतिया धावबाद झाला. त्याच षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर शेरफेन रदरफोर्डही झेलबाद झाला. या दोन्ही विकेट दीपक चहरच्या षटकात आल्या. अशाप्रकारे, गुजरातने सलग ३ चेंडूत फक्त १७९ धावांवर ४ विकेट्स गमावल्या. हे पाहून आशिष नेहराला राग अनावर झाला आणि लाईव्ह सामन्यात फलंदाजांना फटकारायला सुरुवात केली.
हेही वाचा – GT vs MI : हार्दिक पंड्याने पुन्हा केली तीच चूक! BCCI ने ठोठावला तब्बल ‘इतक्या’ लाखांचा दंड, काय आहे कारण?
गुजरात टायटन्सने सामन्यात मारली बाजी –
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना जीटीने १९६ ८ बाद धावा केल्या होत्या. संघाकडून साई सुदर्शनने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ४१ चेंडूत ६८ धावांची खेळी केली. याशिवाय शुबमन गिलने २७ चेंडूत ३८ धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईचा संघ ६ गडी गमावून फक्त १६० धावाच करु शकला. मुंबईकडून सूर्यकुमार यादवने सर्वाधिक धावा केल्या. त्याने २८ चेंडूत ४८ धावांची खेळी केली. त्याच्याशिवाय तिलक वर्माने ३६ चेंडूत ३९ धावा केल्या.





