Rashid Khan Citizenship Offer : भारत-ऑस्ट्रेलियाच्या नागरिकत्वाची ऑफर नाकारली! ७००+ विकेट्स घेणाऱ्या दिग्गज गोलंदाजाचा मोठा खुलासा
Rashid Khan Citizenship Offer : अफगाणिस्तानचा स्टार लेग-स्पिनर राशिद खान याने आपल्या आगामी आत्मचरित्रात एक खळबळजनक खुलासा केला आहे.

Rashid Khan Citizenship Offer India Australia : आयपीएल २०२६ मध्ये गुजरात टायटन्ससाठी खेळणारा राशिद खान सध्या त्याच्या ‘राशिद खान: फ्रॉम स्ट्रीट टू स्टारडम’ या पुस्तकामुळे चर्चेत आहे. या पुस्तकात राशिदने नमूद केले आहे की, त्याला भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशांनी त्यांच्या देशाकडून खेळण्यासाठी नागरिकत्वाची ऑफर दिली होती. मात्र, आपल्या देशाप्रती असलेल्या प्रेमापोटी त्याने या दोन्ही मोठ्या ऑफर धुडकावून लावल्या.
बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिला होता प्रस्ताव –
पुस्तकातील माहितीनुसार, आयपीएल २०२३ दरम्यान बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने राशिदशी संवाद साधला होता. अफगाणिस्तानमधील राजकीय आणि अस्थिर परिस्थितीचा दाखला देत, त्यांनी राशिदला भारतात कायमस्वरूपी स्थायिक होण्याचा आणि भारतीय दस्तऐवज (नागरिकत्व) स्वीकारण्याचा प्रस्ताव दिला होता.
RASHID KHAN ON GETTING INDIAN CITIZENSHIP OFFERS. 🗣️ pic.twitter.com/hvuqgUK5S0
— Mir Hamza Mughal (@2Mirhamzamughal) April 20, 2026
राशिदने या प्रसंगाचे वर्णन करताना लिहिले की, “त्यांनी मला विचारले की अफगाणिस्तानची स्थिती सध्या खराब आहे, तुम्ही भारतात का येत नाही? आम्ही तुम्हाला भारतीय नागरिकत्व देऊ, तुम्ही इथूनच क्रिकेट खेळा.” यावर राशिदने हसून उत्तर दिले, “खूप खूप धन्यवाद, पण मी माझ्या अफगाणिस्तानसाठीच खेळणार. जर मी माझ्या देशासाठी खेळू शकलो नाही, तर मी जगातील इतर कोणत्याही देशासाठी खेळणार नाही.”
टी-२० क्रिकेटचा ‘बादशाह’ –
राशिदने ऑस्ट्रेलियाकडून मिळालेल्या ऑफरबद्दल फारसा खुलासा केला नसला तरी, त्याने आपली निष्ठा स्पष्ट केली आहे. सध्या आयपीएल २०२६ मध्येही तो गुजरातसाठी सर्वाधिक किफायतशीर गोलंदाज ठरला असून, २० षटकांत १५४ धावा देत त्याने ६ विकेट्स घेतल्या आहेत. राशिद खान हा टी-२० इतिहासातील सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. त्याने ५२४ टी-२० सामन्यांत तब्बल ७०८ विकेट्स घेतल्या आहेत, तर आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये ११५ सामन्यांत १९३ विकेट्स घेण्याचा विक्रमही त्याच्याच नावावर आहे.





