आळंदी, – मुलींचे लैंगिक शोषण आणि छळापासून संरक्षण करण्यासाठी आळंदी पोलिसांकडून (Alandi Police) सतत मोहीम राबवली जात आहे. परिसरातील शाळा, महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थीनींना ‘गुड टच, बॅड टच’ ( Good touch bad touch) याविषयी समजावून सांगितले जात आहे, जेणेकरून कोणीही त्यांच्याशी गैरवर्तन केले तर त्यांना लगेच समजेल. आळंदी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील नव माध्यमिक विद्यालय मरकळ, जि.प. शाळा पिंपळगाव, संस्कार गुरुकुल, ज्ञानसाई इंग्लिश मिडियम स्कुल, ज्ञानेश्वर विद्यालय आळंदी, जि.प. शाळा सोळू, जि.प. शाळा धानोरे आदी शाळा, महाविद्यालयांमध्ये जाऊन वरीष्ठ पोलिस निरीक्षक सुनील गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी पथकाचे (Damini Pathak) महिला पोलीस अंमलदार माया मावळे, माया मोरे, उपनिरीक्षक कामथे मॅडम यांनी विद्यार्थिनींना स्पर्शज्ञानाचे धडे दिले.
कमेंट खपवून घेऊ नका –
विद्यार्थीनींनी शाळेत ये-जा करताना काही जणांकडून अश्लील किंवा अनावश्यक कमेंट केल्या जातात. अशा कमेंट होत असल्यास विद्यार्थिनींनी आई-वडील, शिक्षिका, किंवा दामिनी पथकाला माहिती द्यावी किंवा पोलिसांच्या 112 या हेल्पलाइन क्रमांकावर माहिती द्यावी. त्यामुळे छेडछाडीच्या प्रकारांना आळा बसण्यास मदत होईल, अशी माहिती मरकळ येथील नव माध्यमिक विद्यालयात दामिनी पथकाने दिली. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्य लाटे मॅडम, उपनिरीक्षक कामथे मॅडम, अंमलदार माया मोरे, अंमलदार माया मावळे, अंमलदार उद्धव गोल्हार उपस्थितीत होते.
गुड टच, बॅड टच कसा ओळखावा ?
घरातील व्यक्ती कोणी स्पर्श करते तेव्हा सुखद आणि सुरक्षित वाटते तो एक चांगला स्पर्श असतो, जसे की आई-वडिलांची मिठी, आजी-आजोबांचे प्रेम, खेळताना मित्रांचा स्पर्श हे सर्व मुलांना आनंददायी आणि सुरक्षित भावना देतात. हे गुड टच आहे. तर कोणीतरी अयोग्यरित्या आणि चुकीच्या ठिकाणी, नको त्या ठिकाणी स्पर्श करतो तेव्हा अस्वस्थ, वाईट वाटते. एखाद्याने शरीराला स्पर्श केला आणि कोणालाही सांगू नको असे सांगितले तर हे बॅड टच आहे. असा स्पर्श मुलींना टाळायचा असतो. आपल्यासोबत असे काही घडले तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. आपल्या पलकांना, नातेवाईकांना किंवा पोलिसांना माहिती द्यावी, असेही मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.