नवी दिल्ली – डॉलर कमकुवत होत असल्यामुळे आता बरीच गुंतवणूक सोने आणि चांदीकडे वळू लागली आहे. अशा परिस्थितीत जागतिक बाजारात सोने आणि चांदीचे दर वाढून पाच महिन्याच्या उच्चांकावर गेले आहेत. गेल्या आठवड्यात सोने आणि चांदीचे दर कमी झाले होते. मात्र आज मागणी वाढल्यामुळे सोने आणि चांदीच्या दरात वाढ नोंदली गेली.
दिल्ली सराफात सोन्याचा दर 318 रुपयांनी वाढून 54,913 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर 682 रुपयांनी वाढून 69,176 रुपये प्रति किलो झाला. जागतिक बाजारात सोन्याचा दर वाढून 1,808 डॉलर व चांदीचा दर 23.70 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला होता.
सोने आणि चांदीच्या दारात वाढ होत असल्याबद्दल एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक दिलीप परमार यांनी सांगितले की, अमेरिकेत महागाई कमी झाल्यामुळे व्याजदर वाढ कमी होणार आहे. अशा परिस्थितीत डॉलरचा भाव एक टक्क्याने कमी होऊन सहा महिन्याच्या निचांकावर अंकावर गेला आहे.
अमेरिकेच्या कर्जरोख्यावरील परतावा कमी होत आहे. त्यामुळे या क्षेत्रातील गुंतवणूक सोन्याकडे वळत असल्यामुळे सोन्याचे दर वाढत आहेत. अमेरिकेच्या फेडरल रिझर्वचे पतधोरण काही तासात जाहीर होणार आहे. यावेळी अमेरिका व्याजदरात 0.75 टक्क्याऐवजी 0.50% वाढ करण्याची शक्यता गृहीत धरली जाऊ लागली आहे.