Good luckcafe Pune : बन मस्कामध्ये काच, आता अंडाभुर्जीत झुरळ; गुडलक कॅफेच्या दुसऱ्या शाखेतील धक्कादायक प्रकार समोर

Good luck Pune : गेल्या काही दिवसांपूर्वी पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावरील प्रसिद्ध गुडलक कॅफेमध्ये बन मस्कामध्ये काच आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. यानंतर आता मुंबई-पुणे हायवेवरील फूड प्लाझामध्ये असलेल्या गुडलक कॅफेमध्ये अंडाभुर्जीत झुरळ सापडल्याची घटना घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावरील गुडलक कॅफे हे खवय्यैप्रमेंसाठी खाण्याचे प्रसिद्ध ठिकाण मानले जाते. गेल्या कित्येक वर्षांपासून ग्राहकांच्या सेवेते गुडलक कॅफे आहे. नुकतीच येथील बन मस्कामध्ये काच आढळून आल्याचा प्रकार समोर आला होता. याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या घटनेनंतर अन्न आणि औषध प्रशासनाने या कॅफेचा तात्पुरता परवाना रद्द केला होता.
या त्रुटींची पूर्तता केल्यावरच कॅफे पुन्हा सुरू करण्याची परवानगी देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, या प्रकरणाची चौकशी पूर्ण होण्याआधीच गुडलक कॅफेच्या दुसऱ्या शाखेत अंडाभुर्जीत झुरळ आढळून आल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
या धक्कादायक प्रकारानंतर पुन्हा एकदा गुडलक कॅफे चर्चेत आले आहे. पुण्यातील प्रसिद्ध हॅाटेलमध्ये असे प्रकार घडल्याने ग्राहक संताप व्यक्त करत आहेत. यामुळे आता या घटनेनंतर अन्न सुरक्षा विभागाने या शाखेचीही चौकशी करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. मात्र, गुडलक व्यवस्थापनाने अद्याप या प्रकरणावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.





