माणिकराव कोकाटेंचा उद्या राजीनामा? अजित पवारांचा फोन, पत्रकार परिषदेत होणार खुलासा!

मुंबई – राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानसभेत ऑनलाइन रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने राजकीय वादळ निर्माण झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते कोकाटे यांच्या या कृतीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “सभागृहात गांभीर्य आवश्यक आहे. कोकाटे यांचे स्पष्टीकरण भूषणावह नाही,” असे फडणवीस म्हणाले. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोकाटेंशी फोनवर चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली, परंतु कोकाटे यांनी फोन आल्याचे नाकारले.
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी हा व्हिडीओ शेअर करत कोकाटेंवर टीका केली. “शेतकरी संकटात असताना कृषिमंत्री रमी खेळतात,” असे म्हणत त्यांनी राजीनाम्याची मागणी केली. विरोधकांनीही या प्रकरणावरून सरकारला धारेवर धरले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी कोकाटेंच्या वागण्याला अयोग्य ठरवत कारवाईचा निर्णय अजित पवार घेतील, असे सांगितले.
कोकाटे यांनी सिन्नर येथे दूध संघ कार्यालयात पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. मंगळवारी (२२ जुलै) सकाळी ९ वाजता ते सिन्नरला पत्रकार परिषद घेणार आहेत. पत्रकार परिषदेत माणिकराव कोकाटे काय निर्णय जाहीर करणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. शेतकऱ्यांच्या गंभीर संकटकाळात कृषिमंत्र्यांचे रमी खेळणे असंवेदनशील असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
कोकाटे यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, ते रमी खेळत नसून जाहिरात स्किप करत होते. मात्र, हे स्पष्टीकरण समाधानकारक नसल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले. लातूर येथे छावा संघटनेने कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी तटकरेंना निवेदन देताना पत्ते फेकले, त्यानंतर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा प्रकार घडला.
मंगळवारी सकाळी ९ वाजता सिन्नर येथे पत्रकार परिषदेत कोकाटे आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. अजित पवारांच्या फोननंतर कोकाटेंचा राजीनामा होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





