Ghodegaon News: वसतिगृहांच्या नव्या नियमांविरोधात विद्यार्थी आक्रमक; घोडेगाव प्रकल्प कार्यालयावर धडक मोर्चा
Ghodegaon News: आदिवासी विकास विभागाची ५ ऑगस्टची सुधारित नियमावली विद्यार्थीविरोधी असल्याचा आरोप; स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे घोडेगावात आंदोलन.

Ghodegaon News – आदिवासी विकास विभागाने ५ ऑगस्ट २०२६ रोजी शासकीय आदिवासी वसतिगृहांसाठी जारी केलेली सुधारित नियमावली विद्यार्थीविरोधी असून ती तात्काळ रद्द करावी, या मागणीसाठी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय), पुणे जिल्हा समितीच्या वतीने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, घोडेगाव येथे शुक्रवारी आंदोलन करण्यात आले.
एसएफआयने वयोमर्यादा २६ वरून पदव्युत्तर व संशोधन विद्यार्थ्यांसाठी ३० वर्षे करावी, पालकांच्या अडीच लाख रुपयांच्या उत्पन्नाची मर्यादा सहा लाख रुपये करावी, दुसरी पदवी किंवा व्यावसायिक अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृह नाकारण्याची अट रद्द करावी, अशी मागणी केली. तसेच पाच किंवा पंधरा किलोमीटर अंतराच्या निकषामुळे प्रवेश नाकारू नये, विवाहित विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा,
शिक्षणातील दोन वर्षांपर्यंतचा खंड ग्राह्य धरावा आणि ऑनलाइन प्रक्रियेत अडचणी आल्यास विद्यार्थ्यांना दुरुस्तीची संधी द्यावी, अशी मागणी करण्यात आली. या मागण्यांबाबत सहाय्यक प्रकल्प अधिकारी संदिप पाटील यांच्याशी चर्चा झाली. मागण्या वरिष्ठ कार्यालयाकडे तातडीने पाठविण्याचे आश्वासन त्यांनी दिले. मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा एसएफआयने दिला.
यावेळी एसएफआयचे राज्य उपाध्यक्ष नवनाथ मोरे, राज्य सहसचिव निशा साबळे, पुणे जिल्हाध्यक्ष संस्कृती गोडे, सचिव अक्षय घोडे, आंबेगाव तालुकाध्यक्ष समीक्षा केदारी, सचिव रोहिदास फलके, मयूर हिले, प्रियंका गोडे, आकाश खामकर, कुणाल दाभाडे, प्रिया पारधी व विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते.





