Congress Protest: रस्त्यावरील खड्ड्यात कापला केक! पुणे महापालिकेविरुद्ध काँग्रेसचे ‘खड्डे मे बर्थ-डे’ आंदोलन
Congress Protest: कोट्यवधींचा निधी खर्चूनही रस्त्यांची दुर्दशा; स्वारगेट पीएमपीएमएल डेपोसमोर खड्ड्यात केक कापून आणि पारंपरिक खेळ खेळून पालिकेचा निषेध.

Congress Protest – पुणे शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांकडे महापालिकचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी गुरुवारी स्वारगेट येथे खड्डे मे बर्थ-डे हे अभिनव आंदोलन केले. स्वारगेट येथील पीएमपीएमएल डेपोसमोर रस्त्यावरील खड्ड्यात केक कापून नव्याने तयार झालेल्या खड्ड्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी विकास गेला खड्ड्यात, असा उपरोधिक संदेश देत विटी-दांडू,
गोट्या आदी पारंपरिक खेळही खेळण्यात आले. प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस संजय बालगुडे यांनी या आंदोलनाचे आयोजन केले होते. शहरातील विविध भागांतील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, त्याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे दररोज अपघात होत असून, वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
रस्त्यांच्या निकृष्ट कामांमुळे पुणेकरांना त्याचे दुष्परिणाम भोगावे लागत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. रस्ते विकासाचे हवे होते, मिळाले मात्र खड्ड्यांचे गिफ्ट, असा टोला लगावत काँग्रेस कार्यकर्त्यांनी पालिका प्रशासनाच्या कारभारावर टीका केली. रस्त्यांच्या कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केले जातो,
मात्र त्यानंतरही रस्त्यांची दूरवस्था होत असल्याने ठेकेदारांच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचे आंदोलकांनी सांगितले. यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनीही आंदोलनाला प्रतिसाद देत पुणे गेले खड्ड्यात…, या प्रशासनाचे काय करायचे? अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. या आंदोलनात माजी महापौर अंकुश काकडे, शिव मंत्री, ऋषिकेश बालगुडे यांच्यासह काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.




