नगर – प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून नगर शहरातील संजयनगर भागात घरकूल प्रकल्प उभारण्यात येत आहे. गेल्या दोन वर्षात 298 सदनिकांपैकी अवद्या 33 सदनिकांची कामे पूर्ण झाली असून उर्वरित 265 सदनिकांचे कामे सुरू होत नसल्याचे चित्र आहे.
प्रकल्पाचे काम करणाऱ्या मे. करी स्टोन या ठेकेदार संस्थेकडून कामे करण्यात दिरंगाई होत असल्याने उपलब्ध झालेला निधी वेळेत कामे न झाल्याने शासनाला परत गेला आहे. मात्र याबाबत ठेकेदार संस्थेकडून महापालिकेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा प्रयत्न झाला. याबाबत महापालिकेने खुलासा केला असून कामे वेळेत होत नसल्याने हा निधी परत गेल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
संजयनगर येथे 298 पैकी 33 सदनिकांचे काम पूर्ण झाले आहे. या सदनिकेचा ताबाही संबंधित लाभार्थीना देण्यात आला आहे. दि. 28 सप्टेंबर 2021 रोजी राज्य शासनाकडून 33 सदनिकेसाठी प्रथम हप्त्याचे 13 लाख 20 हजार अनुदान आले होते. ते झालेल्या कामापोटी मे. करी स्टोन या ठेकदार संस्थेला दि. 2 डिसेंबर 2021 रोजी वितरीत करण्यात आले. त्यानंतर केंद्र शासनाचे 298 सदनिकेसाठी प्रथम हप्त्याने प्लिंथ लेव्हलपर्यंतच्या कामासाठी 1 कोटी 78 लाख 80 हजार रुपये अनुदान आले. मात्र, तरीही 33 सदनिकांच्या कामापोटी मे. करी स्टोन डिझाईन यांना प्रथम हप्ता व द्वितीय हप्ता असे 39.60 लाख रुपये वितरीत करण्यात आले.
17 नोव्हेंबर 2022 रोजी राज्य शासनाकडून 33 सदनिकेसाठी दुसरा हप्ता 13 लाख 20 हजार रुपये प्राप्त झाले होते. मात्र, केंद्र शासनाकडून फक्त प्रथम हप्त्याचेच अनुदान प्राप्त झाले असतांना दुसऱ्या हप्त्याचेही अनुदान मे. करी स्टोन यांना वितरीत करण्यात आले. त्यानंतर मे. करी स्टोन यांना अनेकवेळा काम सुरु करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मात्र, त्यांनी काम सुरु केले नाही. त्यामुळे राज्य शासनाचा दुसरा हप्ता वितरीत करता आलेला नाही. मे.करी स्टोनकडून उर्वरित 265 सदनिकांचे काम सुरु न झाल्याने हा निधी अखर्चित राहिला व प्रचलित धोरणानुसार हा निधी 1 एप्रिल 2023 रोजी एसएनए खात्यात परत जमा झाला. संस्थेने काम सुरु केल्यानंतर झालेल्या कामापोटी अनुदानाची मागणी करुन अनुदान वितरीत करता येईल.
संस्थेने केलेल्या कामाच्या तुलनेतच अनुदानाचे वितरण होणे आवश्यक आहे. उर्वरित सदनिकांचे काम सुरू केल्याचे निधी अखर्चित राहिला व तो शासनास परत गेला आहे. असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.