“आता तरी उठा”; पुण्यातील बॅनरवर अण्णा हजारे नाराज; म्हणाले “दुसऱ्यांवर बोट दाखवून…”

Anna Hazare | काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर टीका करत मतदान प्रक्रियेत घोळ झाल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर पुण्यात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा उल्लेख करत झळकलेलै बॅनरची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती.
यात अण्णा हजारे यांच्यावर अण्णा, आता तरी उठा अशा आशयाचे मजकूर लिहून त्यांच्यावर पुणेरी शैलीत टीका करण्यात आली होती. आता पुण्यातील या बॅनरवर खुद्द अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त केली आहे.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे म्हणाले की, “भ्रष्टाचाराला आळा बसण्यासाठी मी १० कायदे केले. माहितीचा अधिकार देशाला मिळाला. यातून किती जागृती दिली. दफ्तर दिरंगाई, बदलीचा कायदा, लोकपाल, लोकायुक्त यासारखे १० कायदे आणले. आता ९० व्या वर्षानंतर अण्णा हजारेंनी हे करतच राहावे आणि तुम्ही झोपून राहावे अशी कुणाची अपेक्षा असेल तर हे चुकीचे आहे. अण्णा हजारे यांनी मागच्या काळात जे केले ते तरूणांनी केले पाहिजे.” Anna Hazare |
युवाशक्ती ही राष्ट्रशक्ती
“आपण नुकताच स्वातंत्र्यदिन साजरा केला. मी देशाचा नागरिक आहे. केवळ हातात तिरंगा घेऊन काही होणार नाही. या देशासाठी ज्यांनी बलिदान केले त्यांची आठवण ठेवली पाहिजे. फक्त दुसऱ्यांवर बोट दाखवून त्यातून बदल होणार नाही. मी मोठ्या आशेने तरुणांकडे पाहत आहे. युवाशक्ती ही राष्ट्रशक्ती आहे. ही तरूणाई जागी झाली तर उद्याचं भविष्य दूर नाही असं मला वाटते. म्हणून कायदे करून तरूणांच्या हातात दिले आहेत. आता एवढी वर्ष झाली, आजही अण्णा हजारे यांनी जागे व्हावे हे ऐकल्यानंतर वाईट वाटते,” अशी खंत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी व्यक्त केली.
बॅनरवरील मजकूर
“अण्णा आतातरी उठा…कुंभकर्णसुद्धा गाढ झोपेतून रावणासाठी आणि लंकेसाठी उठला होता. तुम्ही आपल्या देशासाठी आतातरी उठा..होय मतांची चोरी झाली आहे… देशात मतांची चोरी होत असताना, देशात भ्रष्टाचार फोफावला असताना, देशात हुकूमशाही माजलेली असताना, देशाची लोकशाही धोक्यात असताना, अण्णा तुमच्या सारखा जेष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा? अण्णा, दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर पुन्हा तुमची जादू पाहण्यासाठी देश आतुर आहे”, अशा आशयाचे बॅनर लागले होते. Anna Hazare |
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतांची चोरी झाल्याचा दावा केला आहे. त्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढत भाजपवर हल्लाबोल केला आहे. ते सातत्याने या मुद्यावर भाष्य करत महाराष्ट्रातही मतचोरी झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. यावरून केंद्रीय पातळीवरील राजकारण चांगलचं तापल्याचं पाहायला मिळत आहे.
निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आव्हान
तर दुसरीकडे रविवारी (१७ ऑगस्ट) निवडणूक आयोगाने मतचोरीचा आरोप लावून धरणारे कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांना थेट आव्हान दिले. आरोपांविषयी ७ दिवसांत प्रतिज्ञापत्र सादर करा. अन्यथा, संबंधित आरोप निराधार मानले जातील.तसेच, निराधार आरोप करणाऱ्यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी आयोगाने केली.
हेही वाचा :
Pimpri News | तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रभाग रचनेस विभागीय आयुक्तांची मान्यता





