Maharashtra politics : काँग्रेसच्या ‘नॉट रीचेबल’ नगरसेवकांवरून खळबळ; भाजप आमदाराचं सूचक विधान म्हणाले…
Maharashtra politics : सिंदेवाही येथील काँग्रेस नगराध्यक्ष भास्कर नन्नावार, मयूर सूचक, दिलीप रामटेके आणि अमृत मडावी हे बंटी भांगडिया यांच्या नागपूर कार्यालयात दिसल्याची चर्चा रंगली आहे.

Maharashtra politics : चंद्रपूर जिल्ह्यातील राजकारण तापलं असून काँग्रेसचे काही नगरसेवक भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. या चर्चांवर भाजप आमदार बंटी भांगडिया यांनी प्रतिक्रिया देताना सूचक विधान केल्याने राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आलं आहे.
“प्रसारमाध्यमांतून मला माहिती मिळाली की काँग्रेसचे 50 ते 60 नगरसेवक नॉट रीचेबल आहेत. मात्र मी काँग्रेस नेता नाही, त्यामुळे त्यांना सांभाळण्याची जबाबदारी माझी नाही,” असं बंटी भांगडिया यांनी म्हटलं. ते पुढे म्हणाले की, “मी त्या भागाचा आमदार असल्याने अनेक नगरसेवक कामानिमित्त माझ्या संपर्कात असतात. पण निवडणुकीच्या संदर्भात मी कोणाशीही संपर्कात नाही. मात्र भाजपचा कार्यकर्ता म्हणून आपल्या उमेदवाराला मदत व्हावी, असा प्रयत्न माझा असतो.”
फोटोमुळे दावा (Maharashtra politics)
दरम्यान, सिंदेवाही येथील काँग्रेस नगराध्यक्ष भास्कर नन्नावार, मयूर सूचक, दिलीप रामटेके आणि अमृत मडावी हे बंटी भांगडिया यांच्या नागपूर कार्यालयात दिसल्याची चर्चा रंगली आहे. या नेत्यांनी विक्ट्री साईन दाखवत फोटो काढल्याने काँग्रेसचे नगरसेवक भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा केला जात आहे. कोरपणा येथील काँग्रेसचे 13 नगरसेवकही भाजपसोबत असल्याची चर्चा सुरू आहे.
बंटी भांगडिया यांचं स्पष्टीकरण (Maharashtra politics)
मात्र, या सर्व दाव्यांना बंटी भांगडिया यांनी फेटाळून लावत स्पष्टीकरण दिलं आहे. “व्हायरल होणारे फोटो माझ्या कार्यालयातील आहेत, पण ते आताचे नाहीत. संबंधित नगरसेवक कामानिमित्त वारंवार भेटत असतात. मित्र म्हणून फोटो काढला, विक्ट्री साईन दाखवला तर त्यात गैर काय?” असा सवाल त्यांनी केला.
वडेट्टीवार यांच्या आरोपांवर प्रत्युत्तर (Maharashtra politics)
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी १०० नगरसेवक आमच्या संपर्कात असल्याच्या दाव्यावर प्रतिक्रिया देताना भांगडिया म्हणाले, “वडेट्टीवार यांनीच सांगितलं की त्यांच्या संपर्कात 100 भाजप नगरसेवक आहेत. घोडेबाजाराचा पुरावा असेल तर तो द्यावा. सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेत. कोणी कुटुंबासोबत बाहेर गेले असेल, फोन नॉट रीचेबल असेल तर त्याला मी कसा जबाबदार?” असा खोचक टोला त्यांनी लगावला.
सूचक विधान
“निवडणुकीत अनेक अदृश्य शक्ती काम करत असतात. कोणी मतदार आम्हाला मदत करायला आला तर आम्ही त्याचं स्वागत करू,” असे सूचक विधान बंटी भांगडिया यांनी केले आहे. “भाजपचा उमेदवार निवडून आणण्यासाठी जे काही करावं लागेल ते आम्ही करू. उमेदवार आमची चॉईस नसली तरी भाजप आमची चॉईस आहे,” असं ठामपणे बंटी भांगडिया यांनी सांगितले.
हेही वाचा : Vivo Y600 Turbo: ‘व्हिवो Y600 टर्बो’ लॉन्च; एकदा चार्ज करा आणि दोन दिवस टेन्शन फ्री रहा!





