Vidhan Parishad Election 2026 : शिंदेंची गुप्त दिल्लीवारी, फडणवीसांची ‘वर्षा’वर बैठक; महायुतीत नेमकं काय सुरू आहे?
Vidhan Parishad Election 2026 : या काळात एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांची भेट घेण्यासाठी अनेक प्रयत्न केले. मात्र, अमित शाह यांची वेळ मिळू न शकल्याने ही भेट होऊ शकली नाही.

Vidhan Parishad Election 2026 : राज्यात विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपाच्या घडामोडींना वेग आला आहे. महायुतीमध्ये जागावाटपावरुन रस्सीखेच सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शाह यांची भेट घेतली असल्याचे माहिती समोर आली आहे.
अमित शाह यांची एकनाथ शिंदे यांनी भेट घेतल्यानंतर राज्याच्या राजकारणात विविध चर्चांना हवा मिळत असते. यावेळी मात्र एकनाथ शिंदे यांनी कोणालाही जराही सुगावा लागू न देता दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. ही भेट राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पाश्वभूमीवर महत्वाची मानली जात आहेय.
या भेटीचा तपशील समोर आला नसला तरी प्राथमिक माहितीनुसार, चार दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे हे दिल्लीत गेले होते. एकनाथ शिंदे यांचा हा दिल्ली दौरा फक्त दोन दिवसांचा होता. या काळात एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांची भेट घेण्यासाठी अनेक प्रयत्न केले. मात्र, अमित शाह यांची वेळ मिळू न शकल्याने ही भेट होऊ शकली नाही.
त्यामुळे एकनाथ शिंदे पुन्हा महाराष्ट्रात परतले होते. मात्र, त्यानंतरही एकनाथ शिंदे हे अमित शाह यांची भेट घेण्यासाठी वारंवार प्रयत्न करत होते. शनिवारी रात्री एकनाथ शिंदे यांना दिल्लीत भेटीसाठी येण्याचा निरोप पाठवण्यात आला. त्यानुसार रविवारी एकनाथ शिंदे कोणालाही सुगावा लागू न देता खासगी विमानाने दिल्लीत अमित शाह यांची भेट घेण्यासाठी पोहोचले.
माजी मंत्री सोबत असल्याची चर्चा
एकनाथ शिंदे यांनी या भेटीबाबत एवढी गुप्तता बाळगली होती की, त्यांच्यासोबत एकही सहाय्यक नव्हता. विशेष म्हणजे या भेटीत एकनाथ शिंदे यांच्यासोबत महाराष्ट्रातील शिक्षणसम्राट आणि माजी मंत्री होता. त्यामुळे या भेटीवरुन विविध चर्चांना उधाण आले आहे.
‘ऑपरेशन टायगर’ राबवून पक्षाचा विस्तार करण्याची एकनाथ शिंदे यांनी योजना आहे. मात्र, त्यासाठी एकनाथ शिंदे यांना दिल्लीतील भाजप नेतृत्त्वाकडून ग्रीन सिग्नल मिळालेला नाही. यासंदर्भात एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांच्यात चर्चा झाल्याची शक्यता आहे.
महायुतीत तणाव
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. यासाठी 18 जून रोजी मतदान तर 22 जून रोजी मतमोजणी होणार आहे. 17 जागांपैकी शिवसेनेला 4 जागा मिळणार असल्याची चर्चा आहे. मात्र शिवसेना भाजपकडे 6 जागांचा प्रस्ताव ठेवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचा 3 जागांवरचा दावा कायम आहे. तर भाजपही 12 जागा मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे महायुतीत जागावाटपावरुन तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
नाराजी दूर करण्यासाठी दोन नेत्यांवर जबाबदारी?
दरम्यान, या सगळ्या घडामोडी घडत असताना विधानपरिषद निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल वर्षा निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीला भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. ही बैठक दोन तास झाली. एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर करण्यासाठी रवींद्र चव्हाण आणि मंत्री बावनकुळे यांच्यावर जबाबदारी देण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे.






