Sunetra Pawar : ‘देवगिरी’वर राजकीय हालचालींना वेग; खोतकर, चिखलीकरांसह शरद पवार गटाच्या आक्रमक महिला नेत्याने घेतली सुनेत्रा पवारांची भेट
Sunetra Pawar : या भेटीत नेमकी काय चर्चा झाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही जागा सोडणार का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. महायुतीतील जागावाटपाच्या तिढ्यात ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

Sunetra Pawar : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटपाची समीकरणं अधिकच गुंतागुंतीची होताना दिसत आहेत. त्यामुळे देवगिरी बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या देवगिरी या निवासस्थानी बड्या नेत्यांनी भेट घेतल्याने उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार लॅाबिंग सुरू असल्याची चर्चा आहे.
अशातच शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी देवगिरी बंगल्यावर जाऊन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे, त्यांनी आपला मुलगा अभिमन्यू खोतकर याच्यासाठी विधान परिषदेची उमेदवारी मागितल्याची माहिती समोर आली आहे.
या भेटीत नेमकी काय चर्चा झाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही जागा सोडणार का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. महायुतीतील जागावाटपाच्या तिढ्यात ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.
अर्जुन खोतकर काय म्हणाले?
भेटीनंतर माध्यमांशी बोलताना अर्जुन खोतकर म्हणाले, “आज कॅबिनेटचा दिवस असल्याने मतदारसंघातील काही कामांसाठी मी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. माझी मुलगी नाही तर मुलगा अभिमन्यू निवडणुकीसाठी इच्छुक आहे. मात्र उमेदवारीबाबत अंतिम निर्णय पक्ष आणि एकनाथ शिंदे साहेब घेतील.”
दरम्यान, विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीतील जागावाटपाचा तिढा आज सुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वर्षा निवासस्थानी महायुतीची महत्त्वाची बैठक बोलावली आहे.
या बैठकीला महायुतीमधील महत्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री उदय सामंत उपस्थित राहणार आहेत.
‘या’ ठिकाणी जोरदार रस्सीखेच
पुणे विधान परिषद जागेवर भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये, तर नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर जागांवर शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
शरद पवार गटाच्या महिला नेत्याने घेतली भेट
शरद पवार गटातील महिला नेत्याने देखील सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्याची माहिती मिळत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवारांच्या पक्षातील युवती अध्यक्ष सक्षणा सलगर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी देवगिरी बंगल्यावरती दाखल झाल्या आहेत.
त्या आपल्या आक्रमक भाषणशैलीसाठी ओळखल्या जातात, राज्यातील विधानपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.
चिखलीकरांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
आमदार प्रतापराव चिखलीकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेण्यासाठी देवगिरी बंगल्यावर हजेरी लावली आहे. नांदेड विधानपरिषद जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली पाहिजे अशी आग्रही भूमिका यावेळी मांडण्यात आल्याची माहिती आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. यासाठी 18 जून रोजी मतदान तर 22 जून रोजी मतमोजणी होणार आहे.
विधानपरिषद निवडणुकीचे वेळापत्रक
निवडणुकीची अधिसूचना- 25 मे
अर्ज भरण्याची शेवटची तारीख- 1 जून
उमेदवारी अर्जांची छाननी- 2 जून
अर्ज माघारीची मुदत- 4 जून
मतदान- 18 जून (स.8 ते दु.4)
मतमोजणी- 22 जून
हेही वाचा : Divyanka Tripathi: प्रेग्नन्सी ग्लोमध्ये खुलली दिव्यांका त्रिपाठी; विवेक दहियासोबतचे खास फोटो व्हायरल






