Gastro Outbreak: तळीयेत गॅस्ट्रोचा भीषण उद्रेक! ३०० जणांना बाधा, पाण्याच्या अहवालानंतर गावात प्रचंड खळबळ
Gastro Outbreak: गॅस्ट्रोचा संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य पथक गावात दाखल; पाणी उकळून पिण्याचे आवाहन करत निष्काळजीपणा करणाऱ्यांवर कारवाईची ग्रामस्थांची मागणी.

Gastro Outbreak: तळीये (ता. कोरेगाव) येथे गेल्या सहा सात दिवसांपासून गॅस्ट्रो-सदृश आजाराने थैमान घातले असून, तब्बल 200 ते 300 नागरिकांना पोटदुखी, उलट्या व जुलाबाचा त्रास झाल्याने ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. अचानक मोठ्या संख्येने नागरिक आजारी पडल्याने आरोग्य यंत्रणेची धावपळ उडाली असून प्राथमिक आरोग्य केंद्रासह विविध ठिकाणी बाधित रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत.
सध्या उपचार घेणार्या रुग्णांची संख्या आटोक्यात येत असल्याची माहिती आहे. रुग्णांची संख्या अचानक वाढल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रातील उपलब्ध जागा अपुरी पडल्याचे दिसून आले. त्यामुळे काही रुग्णांना इतर आरोग्य केंद्रांकडे उपचारासाठी पाठविण्यात आले. गावातील जिल्हा परिषद शाळेसह वाठार स्टेशन, पळशी आणि पिंपोडे बुद्रुक येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतही रुग्णांवर उपचार करण्यात आले.
दूषित पाण्याच्या अहवालाने खळबळ…
गावातील पाणीपुरवठ्याचे जलस्त्रोत दूषित झाल्यामुळेच हा आजार पसरला असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. आरोग्य विभागाने ग्रामस्थ वापरत असलेल्या आठ ठिकाणाचे पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले होते त्यापैकी चार नमुने दूषित आढळले.या नमुन्यांच्या अहवालात पाणी दूषित (पिण्यायोग्य नसल्याचे) निष्पन्न झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे गावातील पाणीपुरवठा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ग्रामपंचायत की प्रशासन? जबाबदारी निश्चित होणार का?
एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने नागरिक आजारी पडल्याने या घटनेला नेमके जबाबदार कोण, असा प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. गावातील पाणीपुरवठा, जलस्रोतांची स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता, गटारी व सांडपाणी व्यवस्थापन याकडे नियमित लक्ष देणे आवश्यक असताना त्यामध्ये कुठे त्रुटी राहिल्या का, याची चौकशी होणे गरजेचे आहे.
दुसरीकडे, साथीच्या आजाराचा उद्रेक झाल्यानंतर त्याचे कारण शोधणे, पाण्याचे नमुने तपासणे, बाधित रुग्णांवर उपचार करणे आणि रोगाचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे ही आरोग्य यंत्रणा व प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे केवळ ग्रामपंचायत किंवा प्रशासनावर दोषारोप न करता संपूर्ण पाणीपुरवठा व सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची वस्तुनिष्ठ चौकशी करण्याची गरज आहे.
आरोग्य विभागाचे पथक गावात दाखल….
नागरिकांनी खबरदारी म्हणून पाणी उकळून प्यावे, वैयक्तिक स्वच्छता राखावी तसेच उलट्या, जुलाब किंवा पोटदुखीची लक्षणे जाणवल्यास विलंब न करता वैद्यकीय उपचार घ्यावेत, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून नेमकी कारणे समोर आणावीत. पाणी दूषित होण्यास कारणीभूत ठरलेली बाब तसेच संबंधित यंत्रणांकडून काही निष्काळजीपणा किंवा नियमभंग झाला असल्यास त्याची जबाबदारी निश्चित करून नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी तळीये ग्रामस्थांकडून होत आहे.





