Koregaon News: कोरेगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; अन्यथा तीव्र आंदोलन! महाविकास आघाडी आक्रमक
Koregaon News: साताऱ्यातील इतर तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश असताना कोरेगाववर अन्याय; महाविकास आघाडीचे प्रांताधिकारी प्रमोद कुदळे यांना निवेदन.

Koregaon News- राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांमध्ये ‘ट्रिगर वन’ लागू करून दुष्काळी उपाययोजना जाहीर करण्यात आल्या असताना प्रत्यक्ष दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या कोरेगाव तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश न केल्याने महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. कोरेगाव तालुका तातडीने दुष्काळग्रस्त जाहीर करावा,
या मागणीचे निवेदन प्रांताधिकारी प्रमोद कुदळे यांना मंगळवारी देण्यात आले. सातारा, खंडाळा, खटाव, माण, फलटण आणि महाबळेश्वर या तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश केला आहे. मात्र, कोरेगाव तालुक्याला वगळण्यात आल्याने शासनाच्या दुष्काळी निकषांबाबत प्रश्न उपस्थित होत असल्याचे महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनात म्हटले आहे.
कोरेगाव तालुक्यातील पूर्व भाडळे खोरे, वाठार स्टेशन, पिंपोडे बुद्रुक यांसह अनेक भागांत पावसाने ओढ दिल्याने खरीप पिकांची अवस्था चिंताजनक झाली आहे. पिकांचे उत्पादन धोक्यात आले असून जनावरांसाठी चारा- पाणी तसेच आगामी काळातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने केवळ कागदोपत्री आकडेवारीवर अवलंबून न राहता प्रत्यक्ष शेतशिवारात जाऊन परिस्थितीची पाहणी करावी,
शेतकरी सवलतींपासून वंचित राहण्याची शक्यता असल्याने तातडीने निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली. तालुक्यातील परिस्थितीची स्वतंत्र पाहणी करून पीक नुकसानीचे पंचनामे करावेत, वस्तुनिष्ठ अहवाल तयार करावा आणि कोरेगावचा दुष्काळी तालुक्यात समावेश करावा, अशी मागणी करण्यात आली. कोरेगाव तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात येईल,
असा इशारा पंचायत समितीच्या सभापती रूपालीताई शिवाजीराव गुरव, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष घनश्याम शिंदे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲड. श्रीकांत चव्हाण, शिवसेना (ठाकरे) पक्षाचे माजी उपजिल्हाप्रमुख दिनेश बर्गे आणि तालुकाप्रमुख सचिन झांजुर्णे यांनी दिला. यावेळी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस मनोहर बर्गे, यांच्यासह महाविकास आघाडीतील पक्षांचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.





