Ganpati Visarjan Accident: विसर्जनाचा आनंद काही क्षणांतच आक्रोशात बदलला; सुरूरमध्ये १७ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत
Ganpati Visarjan Accident: सुरूर येथील लोंढ्याचा ओढा परिसरातील विहिरीत घडली दुर्दैवी घटना; घरातील गणपती विसर्जन करताना १७ वर्षीय आदित्य चव्हाणचा बुडून मृत्यू.

Ganpati Visarjan Accident : सुरूर येथे घरातील गणपतीचे विसर्जन करण्यासाठी गेलेल्या आदित्य संतराम चव्हाण (वय 17) या तरुणाचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. उपस्थितांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांना यश आले नाही. आदित्यच्या मृत्यूने चव्हाण कुटुंबासह सुरूर परिसरावर शोककळा पसरली आहे. आदित्य हा वाई येथील किसन वीर महाविद्यालयात बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत होता.
अभ्यासात हुशार, मनमिळावू स्वभावाचा आणि क्रीडा क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी केलेला आदित्य सर्वांचा लाडका होता. शुक्रवारी घरातील गणपतीची पूजा वआरती झाल्यानंतर गणरायाला निरोप देण्यासाठी चव्हाण कुटुंबीय विसर्जनासाठी सुरूर येथील लोंढ्याचा ओढा परिसरातील विहिरीजवळ गेले असताना आदित्य अचानक विहिरीच्या पाण्यात बुडाला. घटना लक्षात येताच उपस्थितांनी त्याला तातडीने वाचविण्याचा प्रयत्न केला.
आदित्यच्या निधनाची बातमी परिसरात वार्यासारखी पसरताच मित्रपरिवार, नातेवाईक आणि ग्रामस्थांनी चव्हाण कुटुंबीयांकडे धाव घेतली. गणपती विसर्जनाचा आनंद काही क्षणांतच आक्रोशात बदलल्याने संपूर्ण सुरूर परिसर सुन्न झाला. आदित्यच्या पश्चात आई मनीषा, वडील संतराम, बहीण श्रावणी असा परिवार आहे. या घटनेची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.





