Satara : दै. ‘प्रभात’च्या वृत्ताची दखल! जिल्हाधिकाऱ्यांनी मागवली कोयना भूकंपमापन यंत्रणेप्रकरणी माहिती
Satara : कोयना परिसरातील भूकंपमापन यंत्रणा पाच महिन्यांपासून ठप्प असल्याच्या वृत्ताची जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेतली. नवीन डिजिटल यंत्रणा बसविण्याची प्रक्रिया सुरू.

Satara : कोयनानगर ( विजय लाड) : कोयना परिसरातील भूकंपमापन यंत्रणा पाच महिन्यांपासून ठप्प असल्याची माहिती देणाऱ्या दै. ‘प्रभात’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दखल घेतली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी कोयना प्रकल्पाकडून यंत्रणेची सद्यस्थिती आणि नवीन यंत्रणा बसविण्याबाबतची माहिती मागविल्यानंतर कोयना प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता महेश रासनकर यांनी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याशी संवाद साधून भूकंपमापन यंत्रणेची वस्तुस्थिती स्पष्ट केली. उपलब्ध यंत्रणांची कार्यस्थिती, तांत्रिक अडचणी तसेच नवीन डिजिटल भूकंपमापन यंत्रणा बसविण्याच्या प्रक्रियेबाबत त्यांनी माहिती दिली.
कोयनानगर येथील जुन्या भूकंपमापन यंत्रणेतील काही महत्त्वाची उपकरणे बंद असल्याने भूकंपाचा केंद्रबिंदू, जमिनीखालील खोली, अक्षांश व रेखांश यांची सविस्तर माहिती मिळण्यात अडचणी येत आहेत. मात्र, भूकंपाची तीव्रता मोजणारी यंत्रणा कार्यरत असल्याचे प्रकल्पाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
नवीन अद्ययावत डिजिटल यंत्रणा बसविण्याची प्रक्रिया सुरू असून, त्याबाबतचा प्रस्ताव ‘मेरी’, नाशिककडे प्रक्रियेत आहे. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनीही या विषयाचा पाठपुरावा सुरू केला असून, नवीन यंत्रणा लवकर कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत.
दरम्यान, कोयना परिसरात अलीकडेच २.१ ते २.५ रिश्टर क्षमतेचे पाच सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले होते. या पार्श्वभूमीवर भूकंपमापन यंत्रणेच्या सद्यस्थितीचा मुद्दा ऐरणीवर आला. दै. ‘प्रभात’ने या प्रश्नाकडे सातत्याने लक्ष वेधल्यानंतर जिल्हा प्रशासनाने त्याची दखल घेतली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती मागविणे आणि प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांनी थेट संवाद साधून वस्तुस्थिती स्पष्ट करणे, यामुळे या प्रकरणाला प्रशासकीय पातळीवर चालना मिळाली आहे. आता नवीन डिजिटल भूकंपमापन यंत्रणा प्रत्यक्षात कधी कार्यान्वित होते, याकडे कोयना परिसराचे लक्ष लागले आहे.





