ढोल ताशाच्या निनादात… गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात… आनंदी वातावरणात मांगल्याचे प्रतीक असलेल्या लाडक्या गणरायाचे मंगळवारी आगमन झाले. भव्य देखाव्यांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट, पुणेच्या गणरायाचेही पारंपरिक पद्धतीने आगमन झाले. यावेळी भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. ट्रस्टचे विश्वस्त आणि उत्सवप्रमुख पुनीत बालन व जान्हवी धारीवाल-बालन यांनी यावेळी रथाचे सारथ्य केले. याप्रसंगी रथाला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. पुण्यातील असंख्य भाविक या मिरवणुकीत आनंदाने सहभागी झाले होते.
पुणे – ढोल ताशांचा दणाणून सोडणारा आवाज, शंखनाद पथक, बॅंड पथक आणि सोबत “गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’ चा नादघोष अशा मंगलमय वातावरणात मंगळवारी दहा दिवसांच्या गणेशोत्सवाला प्रारंभ झाला. घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मुहूर्तावर विधीवत गणेशाची प्रतिष्ठापना केली. पुढचे दहा दिवस शहरभरात चैतन्यदायी वातावरण अनुभवायला मिळणार आहे.
म्हणावा तेवढा पाऊस न झाल्याने आणि पावसाने काही अंशी दडी मारल्याने राज्यावर दुष्काळाचे सावट आहे. “पाऊस पडू दे आणि बळीराजाला पर्यायाने सर्व प्राणिमात्रांना सुखी ठेव’ अशी प्रार्थना यानिमित्ताने भाविकांनी गणराया चरणी केली. त्यातून कृष्णजन्माष्टमी देखील शहरात दणक्यात साजरी झाली. त्यानंतर गणेशोत्सवाचे वेध लागले. गेले महिनाभर गणेशोत्सवाची तयारी घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये सुरू होती. देखावे आणि त्याची तयारी या सगळ्यामुळे शहरात उत्सवाचे वातावरण होतेच. मंगळवारी गणेश प्रतिष्ठापनेने ही प्रतीक्षाही संपली आणि उत्साह, जल्लोषाला सुरूवात झाली. मानाच्या गणपती मंडळांची प्रतिष्ठापना दुपारी तीनपर्यंत झाली.
ढोलताशा, बॅंड यांच्या गजरात शहर आणि उपनगरातील सार्वजनिक गणपतींची सायंकाळपर्यंत प्रतिष्ठापना करण्यात आली. दुपारी पावसाच्या हलक्या सरी बहुतांश घरगुती गणपतींची प्रतिष्ठापना सकाळीच करण्यात आली. परंतु सार्वजनिक मंडळांच्या गणेशाची प्रतिष्ठापना मिरवणुकीने होत असल्याने मिरवणुका सुरू असतानाच दुपारी दहा मिनिटे पावसाच्या हलक्या सरी आल्या. मात्र, मिरवणुकांमध्ये कोणताही व्यत्यय आला नाही.
मानाच्या गणपतींची मिरवणुकीने प्रतिष्ठापना
कसबा, जोगेश्वरी, गुरूजी तालीम, तुळशीबाग या मानाच्या चार गणपती मंडळांनी सकाळी साडेआठ-नऊ वाजल्यापासूनच मिरवणुकीला सुरूवात केली. मानाचा पाचवा असलेला केसरीवाड्याचा गणपती टिळक पंचांगानुसार या आधीच प्रतिष्ठापित करण्यात आला आहे. त्यामुळे त्याच्या उत्सवाला या आधीच सुरूवात झाली आहे. शहरातील लक्ष्मीरस्ता, अप्पा बळवंत चौक, बाजीराव रस्ता या मुख्य रस्त्यांवरून या मंडळाच्या गणपतींची मिरवणूक काढण्यात आली.
यामध्ये ढोलताशा, ध्वज पथक, बॅंडपथक सहभागी झाल्याने ही मिरवणूक अतिशय देखणी झाली. विविध मान्यवरांच्या हस्ते या मानाच्या गणपतींची उत्सव मंडपात प्रतिष्ठापना करण्यात आली. याशिवाय श्रीमंत दगडूशेठ गणपती, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांचा गणपती तसेच अखिल मंडई मंडळाचा शारदा गणेश या अन्य प्रसिद्ध गणपतींचीही दुपारी मान्यवरांच्या हस्ते प्रतिष्ठापना करण्यात आली.