Ganesh Visarjan 2025 | नियोजन फेल! गणेश विसर्जन मिरवणूक चक्क ५ तास अधिक रेंगाळली

प्रभात वृत्तसेवा
पुणे – खग्रास चंद्रग्रहण असल्याने ग्रहणापूर्वी मूर्तींचे विसर्जन करायचे, यासाठी एक तास आधी मिरवणुकीला सुरूवात झाली, असे असतानाही या ठरवलेल्या सगळ्या गोष्टी पूर्णपणे मागे टाकून उलट मागील वर्षीपेक्षा तब्बल पाच तास १५ मिनिटे अधिक रेंगाळलेल्या विसर्जन मिरवणुकीने वेळेचा अत्युच्च कळस गाठत सुमारे ३४ तासांचा टप्पा गाठला आणि गणेशोत्सवाची सांगता झाली.
पोलिसांचे ढिसाळ नियोजन, डीजेचा वाढलेला आवाजाचा टप्पा आणि ढोलपथकांची अरेरावी यासगळ्यांचा यंदाच्या गणेशोत्सवात अतिरेक पहायला मिळाला. खग्रास चंद्रग्रहण असल्याने मिरवणूक लवकर संपवण्याचा निर्धार गणेश मंडळांनी पोलिसांबरोबर, महापालिकेबरोबर झालेल्या बैठकीत केला होता. वास्तविक ही मागणी मंडळांकडूनच आली होती, असे असतानाही या सगळ्या गोष्टींना स्वत:च फाट्यावर मारत ही मिरवणूक खूपच वेळ चालली, त्यामुळे ग्रहण हा विषय पूर्णपणे मागेच पडला.
मिरवणूक लवकर संपवण्याच्या उद्देश्याने यंदा एक तास आधी म्हणजे सकाळी साडेनऊ वाजताच मिरवणुकीला सुरूवात करण्यात आली, असे असताना मानाच्या गणपतींची मिरवणूक ही आठ तास नऊ मिनिटे चालली. मागील वर्षी ती आठ तास ५३ मिनिटे चालली. मागच्यावर्षीपेक्षा केवळ ४४ मिनिटांचाच फरक पडला.ढगाळ वातावरण असले तरी वरुणराजाने कृपा केली. त्यामुळे भक्तांचा उत्साह द्विगुणित झाला होता.
शंखनाद, ढोल-ताशांचा गजर, डीजेचा दणदणाट या सगळ्या मांदियाळीत भक्तांनी गणपती बाप्पांना निरोप दिला. परंपरेप्रमाणे मिरवणूक सुरू होण्याआधी महात्मा फुले मंडईतील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला आणि स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मानाच्या गणपतींचे पूजन करून विसर्जन मिरवणुकीला सुरूवात करण्यात आली.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, महापालिका आयुक्त नवल किशोर राम, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, कसबा गणपतीचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, तांबडी जोगेश्वरी गणपती मंडळाचे प्रसाद कुलकर्णी, गुरुजी तालीम मंडळाचे प्रवीण परदेशी, श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे विकास पवार आणि लोकमान्य टिळक गणेशोत्सव मंडळाचे उत्सवप्रमुख डॉ. रोहित टिळक, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदीराचे अध्यक्ष सुनील रासने, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे अध्यक्ष संजीव जावळे, अखिल मंडई गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांच्यासह विविध मंडळाचे विश्वस्त, पदाधिकारी उपस्थित होते.
अखिल मंडई मंडळाने केला पोलिसांचा निषेध..
अखिल मंडई मंडळाने आपण सात वाजता बेलबाग चौकातून निघू असे जाहीर केले होते. तशी वेळही त्यांना पोलिसांनी दिली होती. मात्र, बेलबाग चौकातील गर्दी आणि पोलिसांचे न ऐकता मध्ये घुसलेली मंडळे आणि पोलिसांचे ढिसाळ नियोजन, सुटलेले नियंत्रण यामुळे मंडई मंडळाला बेलबाग चौकात यायला रात्रीचे पावणेबारा वाजले. त्यामुळे अखिल मंडई मंडळाने पोलिसांच्या या ढिसाळ कारभाराचा निषेध व्यक्त केला आणि दरवर्षी बेलबाग चौकात पोलीस प्रमुखांच्या हस्ते करण्यात येणारी आरती रद्द केली आणि रथ तसाच लक्ष्मी रस्त्यावर वळवला आणि मार्गस्थ केला.
मिरवणुकीची वैशिष्ट्ये…
– सकाळी ९:३० वा. मुख्य मिरवणुकीला सुरूवात
– मानाच्या बाप्पांची विसर्जन मिरवणूक ८ तास ०९ मिनिटे
– नदीकाठचे बांधकाम केलेले विसर्जन हौद ३८
– विसर्जनासाठी २८१ ठिकाणी सुविधा
– विसर्जनासाठी लोखंडी टाक्या ६४८
– मूर्ती संकलन केंद्रे २४१, निर्माल्य कलश ३२८
– शाडूमाती संकलन केंद्रे ४६
– मानाच्या गणपतींचे विसर्जन कृत्रिम हौदातच
– डीजेचा आणि ढोलांचा दणदणाट डेसिबलच्या मर्यादे पलीकडे
– ढोलवादकांचा अरेरावीपणा आणि पोलिसांच्या ढिसाळ कारभाराचे दर्शन
– खग्रास चंद्रग्रहणाचा मिरवणूक आधी संपण्यावर कोणताही परिणाम नाही





