Pimpri News | “माझ्या बाप्पाला घेऊन जाऊ नका” ; निरोपाच्या वेळी चिमुकली भावुक

प्रभात वृत्तसेवा
खालापूर – गणेशोत्सवात लहान मुलांचा उत्साह डोळ्यांत साठवावा तितका कमीच. मात्र, बाप्पाच्या विसर्जनाची वेळ जवळ आली की घरातील चिमुकल्यांच्या डोळ्यांत पाणी येते. खोपोली शहरातील काजुवाडी येथील निर्वी निलेश पाटील या चिमुकलीने तर बाप्पाच्या मूर्तीला घट्ट मिठी मारून माझ्या बाप्पाला घेऊन जाऊ नका. असा हट्ट धरला. तिच्या डोळ्यात आलेले अश्रू पाहून उपस्थितांचे डोळेही पाणावले. हे हृदयस्पर्शी दृश्य सोशल मीडियावर व्हायरल होत असून सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.
राज्यात गेल्या दहा दिवसांपासून गणेशोत्सवाचा उत्साह ओसंडून वाहत होता. शनिवारी विसर्जनाच्या वेळी भाविकांनी गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा गजरात आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. मात्र, चिमुकल्यांच्या डोळ्यातून अश्रूंचा वर्षाव होताच वातावरण अधिक भावुक झाले.
गणपती हा लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा लाडका देव आहे. परंतु, बाप्पाच्या निरोपाची वेळ आली की विशेषतः मुलांना त्यांचे विसर्जन सहन होत नाही. काही मुले मूर्ती घरीच ठेवण्याचा हट्ट धरतात, काही रडून आपली हळवी भावना व्यक्त करतात. खोपोलीतील या प्रसंगाने अनेक मोठ्यांनाही गलबलून टाकले.





